गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरीस सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्याला १६.२५ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. याला दोन दिवस उलटत नाही तोच मॉरीसने देशांतर्गत क्रिकेटमधील एका टी-२० सामन्यात शानदार कामगिरी करत राजस्थानला एकप्रकारे त्यांची निवड योग्य असल्याचे दाखवून दिले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
दक्षिण आफ्रिकन बोर्डाने आयोजित केलेल्या टी-२० चॅलेंज स्पर्धेत ख्रिस मॉरीसने चमकदार कामगिरी केली. सीएसए (क्रिकेट साउथ आफ्रिका) टी-२० स्पर्धेत टायटन्स संघाकडून खेळतांना मॉरीसने गोलंदाजीत १० धावा देऊन १ गडी बाद केला. तर फलंदाजी करताना अवघ्या ८ चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केली. मॉरीसच्या या अष्टपैलू प्रदर्शनाने टायटन्सच्या संघाने नाईट्स संघावर ६ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात नाईट्स संघ प्रथम फलंदाजी करतांना १६.२ षटकात अवघ्या ११६ धावांवर सर्वबाद झाला. टायटन्सने या आव्हानाचा पाठलाग करताना चार गडी गमावून १७.१ षटकात निर्धारित लक्ष्य गाठले. या पाठलागात मॉरीस व्यतिरिक्त कर्णधार हेन्रिच क्लासीनने देखील नाबाद ५४ धावांची खेळी करत विजयात हातभार लावला.
मॉरीस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू
गुरवारी चेन्नई येथे झालेल्या लिलावात ख्रिस मॉरीसला राजस्थानच्या संघाने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले. यासह मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स (आधीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) यांच्यात चुरस होती. मात्र यात अखेर राजस्थानने बाजी मारली.
मॉरीसला इतक्या विक्रमी किमतीने संघात दाखल करून घेण्याच्या कारणामागचा खुलासाही नुकताच करण्यात आला. राजस्थानचा प्रशिक्षक असलेला कुमार संगकारा या रणनितीबाबत बोलताना म्हणाला, “मॉरीसच्या संघातील समावेशाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधला जातो. त्याला काहीशा अधिक भावाने खरेदी केले गेले असले तरी त्याच्यासाठी एक विशिष्ट भूमिका आम्ही ठरवली होती. म्हणूनच किंमत वाढत गेली असली त्याला आम्ही प्राधान्य दिले.” आता राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाचा हा विश्वास मॉरीस सार्थ ठरवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
स्पायडरमॅन, स्पायडरमॅन! जिममध्ये रिषभ पंतची मस्ती, पाहा मजेदार व्हिडिओ
श्रीलंकन क्रिकेटचा शापित गंधर्व तिलकरत्ने दिलशान
अहमदाबाद कसोटीत उमेश यादव खेळणार का नाही? येत्या २ दिवसांत घेतला जाणार निर्णय