आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. माहीच्या जागी ऋतुराज गायकवाडला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आलंय. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर अनेक दिग्गज या संदर्भात आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता यावर सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठं वक्तव्य केलं.
यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये एमएस धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यावेळी रवींद्र जडेजाला नवा कर्णधार बनवण्यात आलं. मात्र जडेजा कर्णधार म्हणून प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर धोनीनं हंगामाच्या मध्यात पुन्हा कमान सांभाळली होती. अशा परिस्थितीत यावेळी आयपीएल 2024 च्या आधीच धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना विश्वास आहे की, ऋतुराज गायकवाड सीएसकेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळेल.
रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, “खरं सांगायचं तर त्यावेळी संघाचं नेतृत्व करणारा गट तयार नव्हता. या वर्षी आम्ही आमच्या नेतृत्वाची योजना अतिशय कठोरपणे आखली आहे. धोनीनं काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतल्याचं प्रशिक्षक म्हणाले. गेल्या वर्षी आम्ही आयपीएलचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे आता त्याला वाटलं की कर्णधारपद दुसऱ्याकडे सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे.”
एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर ड्रेसिंग रूममध्ये वातावरण चांगलं होतं. नवीन कर्णधारासोबत काहीसं सेलिब्रेशनही झालं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, 2022 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या सतत फ्लॉप कामगिरीमुळे जडेजाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं.
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, गेल्या वर्षी जडेजानं शेवटच्या चेंडूंवर दोन शॉट्स मारले होते. त्यामुळे त्याचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं. जडेजामध्येही नेतृत्वगुण आहेत आणि तो अतिशय मजबूत खेळाडू आहे. ऋतुराजला त्याच्या उपस्थितीचा नक्कीच फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात आलिशान घर अन् अप्रतिम कार कलेक्शन, जाणून घ्या ऋतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती?
कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव