भारतीय संघातील सध्याच्या क्रिकेटपटूंविषयी बोलायचे झाले तर, भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या समकालीन दिग्गजांना मागे टाकण्याची क्षमता राखतो. ज्याप्रमाणे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हे त्यांच्या निवृत्तीच्या वेळी कसोटी क्रिकेटमध्ये ९९.९४ फलंदाजी सरासरीसह अव्वल क्रमकांकावर होते. अगदी त्याप्रमाणे विराट हा आपल्या समकालीन दिग्गजांच्या पुढे जात वनडेत ५९.३३ आणि टी२०मध्ये ५०.८० या फलंदाजी सरासरीसह अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.
आतापर्यंत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अनेक विक्रमांना आपल्या नावावर केले आहे. शिवाय, कसोटी क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये विराट सचिनप्रमाणे धावा करत आहे. परंतु, एक गोष्ट अशी आहे ज्यामध्ये विराट सचिनच्या २ पाऊल पुढे आहे. ‘ती म्हणजे नेतृत्त्वाच्या दबावातही दमदार फलंदाजी करणे.’
सचिनमध्ये दमदार फलंदाजी करण्याची क्षमता होती. परंतु, संघाचे नेतृत्त्वपद सांभाळताना दबावात येऊन सचिनला मोठ्या आकडी धावा घेता येत नव्हत्या. सचिनने २०० कसोटी सामन्यात ५३.७८च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५१ शतकांचा समावेश होता. पण, भारतीय संघाचा कर्णधार असताना सचिनने २५ कसोटी सामन्यात ५१.३५च्या सरासरीने फक्त २०५४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ७ शतकांचा समावेश होता.
सचिनच्या या आकडेवारींना जास्त वाईटही संबोधता येत नाही, परंतु, स्वत: सचिनने म्हटले होते की, “त्याच्या नेतृत्त्वपदाचा प्रभाव त्याच्या फलंदाजीवर होत असायचा. त्यामुळे त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळता येत नसायचा.”
जर विराटची आकडेवारी पाहिली तर, विराटची कर्णधार बनल्यानंतरची आकडेवारी त्याच्या खेळाडू असतानाच्या आकडेवारीपेक्षा चांगली आहे. कसोटीत कर्णधार बनण्यापुर्वी विराटने ३१ सामन्यात ४१.१३च्या सरासरीने २०९८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ७ शतकांचा समावेश होता. तर, कर्णधार बनल्यानंतर विराटने ५५ कसोटी सामन्यात ६१.२१च्या सरासरीने ५१४२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २० शतकांचा समावेश आहे.
तर, वनडेत कर्णधार बनण्यापुर्वी विराटने १५९ सामन्यात ५१.२९च्या सरासरीने ६७२० धावा केल्या होत्या. यात त्यांच्या २२ शतकांचा समावेश होता. तर, कर्णधार बनल्यानंतर विराटने ८९ सामन्यात ५१४७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २१ शतकांचा समावेश आहे. शिवाय विराटने त्याच्या कारकिर्दीतील ७ द्विशतके ही कर्णधार बनल्यानंतरच केली आहेत. टी२०तील कर्णधार बनल्यानंतरची विराटची आकडेवारीही उल्लेखनीय आहे.