भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत एकमेकांशी भिडत आहेत. पहिल्या दोन सामन्यात संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवत मालिका 1-1ने बरोबरी केली आहे. अशात तिसरा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) ब्रायन लारा स्टेडिअम, त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे विराटला मोठा विक्रम करता आला नाही. आता तो तिसऱ्या वनडेत हा विक्रम करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विराटची नजर ‘या’ विक्रमावर
खरं तर, वनडे कारकीर्दीत विराट कोहली 13000 धावा (Virat Kohli 13000 Runs) करण्याच्या खूपच जवळ आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या सध्या 12898 धावा आहेत. त्याला 13000 धावा करण्यासाठी फक्त 102 धावांची गरज आहे. मात्र, मालिकेच्या पहिल्या वनडेत विराटला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच, दुसऱ्या वनडेत तो खेळला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या वनडेपूर्वीच कदाचित विराटने हा विक्रम मोडला असता, पण आता विराटला तिसऱ्या वनडेत विक्रम रचण्यासाठी शतक ठोकावे लागेल.
फक्त ‘या’ दिग्गजांनी केलाय कारनामा
विराट कोहली याने त्याच्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने 275 वनडे सामने खेळताना 265 डावात 57.32च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 46 शतके झळकावली आहेत. तसेच, आता त्याने 102 धावा केल्या, तर त्याच्या नावावर आणखी एका शतकासोबत 13000 धावांचीही नोंद होईल. यासोबत तो वनडेत सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू बनेल.
आतापर्यंत 4 खेळाडूंना वनडेत 13000 धावांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग आणि सनथ जयसूर्या यांचा समावेश आहे. सचिनने सर्वाधिक 18426 धावा, संगकाराने 14234 धावा, पाँटिंगने 13704 धावा आणि जयसूर्याने 13430 धावा केल्या आहेत. आता या यादीत सामील होण्यासाठी विराटला 102 धावा कराव्या लागणार आहेत.
यावर्षी वनडे विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या अनेक मोठ्या स्पर्धा आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या फॉर्मवर असेल. विशेष म्हणजे, विराट कोहली याने वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलकेविरुद्धच्या मालिकेत दोन शतकेही झळकावली होती. (cricketer virat kohli can complete his 13000 runs in odi cricket if he scores a century in third odi 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
Breaking: स्टार खेळाडूने पुन्हा घेतली कसोटीतून निवृत्ती; म्हणाला, ‘आता जर स्टोक्सचा मेसेज आला, तर…’
बिग ब्रेकिंग! टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय वेस्ट इंडिज संघाची घोषणा, स्टार खेळाडूंचे कमबॅक