भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेतील उपांत्य सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी कोट्यवधी भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच, त्यांना याचीही उत्सुकता आहे की, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, तर पहिला कोणता निर्णय घेतला पाहिजे? गोलंदाजी की फलंदाजी? याचविषयी भारतीय संघाचे माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनी मत मांडले आहे. त्यांनी कर्णधार रोहित शर्मा याला सल्ला दिला आहे.
काय म्हणाले गावसकर?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाणेफेक महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात गोलंदाजांनी दोन्ही डावात केलेले शानदार प्रदर्शन पाहता नाणेफेकीला काहीच महत्त्व नाहीये. मात्र, गावसकरांनी हेही म्हटले की, वानखेडे स्टेडिअम येथे दुसऱ्या डावात चेंडू खूपच स्विंग करतो, हे लक्षात घेता दुसऱ्या डावात गोलंदाजीचा निर्णय गोलंदाजांसाठी फायद्याचा असेल.
ते म्हणाले, “जर तुमच्याकडे भारतासारखे आक्रमण आहे, तर वास्तवात तुम्ही पहिली गोलंदाजी करताय की नंतर, हे महत्त्वाचे ठरत नाही. स्पष्ट आहे की, जर भारताने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली, तर हे फायदेशीर ठरेल. कारण, नंतर मैदानावर थोडे दव पडू लागतात. यामुळे चेंडू यष्टीरक्षकापर्यंत थोडा वेगाने येतो. तसेच, स्विंगही करतो.” गावसकर पुढे असेही म्हणाले की, “भारतीय आक्रमणात बुमराह, सिराज आणि शमीसारखे उच्च दर्जाचे गोलंदाज आहेत. हे तिन्ही गोलंदाज चेंडूने वेगळ्या गोष्टी करण्यात सक्षम आहेत.”
यासोबतच गावसकरांनी कुलदीप यादव याचे महत्त्व सांगत म्हटले की, “खरं तर हे आहे की, जर भारताने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली, तर चेंडू टप्पा पडून जास्त घसरेल. अशात तुलनात्मकरीत्या धावांचा बचाव करणे सोपे होईल. त्यामुळे निश्चितरीत्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे भारतीय गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. तसेच, यामुळे कुलदीप यादवलाही खेळपट्टीतून फायदा मिळेल. इथे जर पहिली 260-270 धावसंख्या बनली, तर न्यूझीलंडवर दबाव आणण्यासाठी पुरेसे राहील.”
रोहित शर्मा याला सल्ला देत गावसकर म्हणाले की, “त्याने आपल्या शैलीत आक्रमक फलंदाजी केली पाहिजे. संघाला आक्रमक सुरुवात मिळेल, याची रोहितने काळजी घ्यावी.”
मागील पराभवाचा वचपा काढणार भारत?
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ 2019च्या विश्वचषक उपांत्य सामन्यातही आमने-सामने आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने भारतीय संघाला 18 धावांनी पराभूत केले होते. या पराभवामुळे भारताचे अंतिम सामन्यात जाण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले होते. अशात पुन्हा एकदा हे संघ आमने-सामने आले आहेत. अशात भारत मागील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. (CWC 23 ind vs nz semifinal should india do batting first or bowling sunil gavaskar gives this important suggestion)
हेही वाचा-
IND vs NZ: सेमीफायनलपूर्वी रैनाने ‘हिटमॅन’सोबत केली ‘या’ खेळाडूची तुलना; म्हणाला, ‘तो रोहितसारखाच…’
World Cup Semi Final: वानखेडेच्या खेळपट्टीबाबत स्पष्टच बोलला रोहित, म्हणाला, “इथे आम्ही भरपूर…”