भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने संपले असून अखेरच्या दोन सामन्यांची लढत बाकी आहे. तत्पुर्वी काही विषयांवरुन दोन्ही संघात वाद पेटताना दिसत आहे. रोहित शर्मासह पाच भारतीय खेळाडूंनी जैव सुरक्षित वातावरणातील नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप, भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यास दिलेला नकार, यावरुन वाद निर्माण होताना दिसत आहेत. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी बाहेरील विवादांमुळे भारतीय संघाचा फायदा होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
स्पोर्ट्स टुडेशी बोलताना दासगुप्ता म्हणाले की, “रोहित शर्मा आणि रिषभ पंतसह जैव सुरक्षित वातावरणाचे नियम मोडले असल्याचा आरोप काही भारतीय खेळाडूंवर करण्यात आला आहे. याशिवाय क्विन्सलँड सरकारने आणि काही क्रिकेटपटूंनी अपुष्ट अहवालांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढेच काय कमी होते की, कोरोनाच्या कडक नियमांमुळे ब्रिस्बेनमध्ये होणारा चौथा कसोटी सामना सिडनीत आयोजण्याची मागणी भारतीय संघाने केली आहे.”
“खरे तर, ऑस्ट्रेलिया संघाची इच्छा नाही की, पाहुण्या भारतीय संघाने आपल्या सीनियर संघातील उणीवांवर लक्ष द्यावे. यामुळे पुढील कसोटी सामन्यापर्यंत बाहेरील विवाद पूर्णपणे मिटवण्याचा ते प्रयत्न करतील. असे असले तरी, मैदानाबाहेरील प्रकरणांचा भारतीय संघावर विपरीत परिणाम होणार नाही. याउलट त्यांना यापासून मदत मिळणार आहे,” असे पुढे बोलताना दीप दासगुप्ता यांनी सांगितले आहे.
असा सुरु झाला भारतीय खेळाडूंबाबतचा वाद
काही दिवसांपुर्वी भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हे खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दरम्यान त्याच ठिकाणी भारतीय संघाचा नवलदीप सिंग हा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता. त्याने क्रिकेटपटूंप्रती आपले स्नेह व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नकळत त्यांच्या जेवणाचे बील भरले. त्यानंतर खेळाडूंना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी चाहत्याची भेट घेतली. अशी माहिती त्या चाहत्याने ट्विटरद्वारे दिली होती.
यानंतर या भारतीय खेळाडूंनी जैव सुरक्षित वातावरणातील नियमाचे उल्लंघन केले असल्याचे सांगत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. सोबतच याचाही शोध घेत आहेत की जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला आहे की नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले होते.
यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सिडनीला जाण्यापुर्वी सर्व भारतीय खेळाडूंची आणि सहयोगी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तरीही त्यांना सिडनीतील हॉटेलबाहेर निघण्याची सूट देण्यात आलेली नाही.
असा निर्माण झाला ब्रिस्बेन कसोटीचा वाद
माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापूर्वी दुबईत क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागला होता. म्हणजे भारतीय संघ जवळपास १ महिना क्वारंटाईनमध्ये राहिला आहे. अशात चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला गेल्यास परत भारतीय संघाला रुममध्ये कैद रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनी येथे खेळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी क्विन्सलँडची यात्रा करण्यास उत्सुक नसल्याचे कळल्यानंतर तेथील क्रीडामंत्री टिम मंडेर यांनी भाष्य केले आहे. “जर भारतीय संघाला आमच्या नियमांनुसार चालायचे नसेल, तर त्यांनी चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला येऊ नये,” असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनची झुंजार दीडशतकी खेळी, ‘या’ मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
सिडनीत भारतीय खेळाडूंवर लागू झालेत निर्बंध; हॉटेलच्या बाहेर जाण्यासही परवानगी नाही