fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२६ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा झाला असा पराभव; तर इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 118 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांची कसोटी मालिकाही 4-1 ने जिंकली.

तसेच भारताने 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार सामन्यात पराभव पत्करला आहे. याआधी 1991-92 मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-4 असा पराभव पत्करला होता.

या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 464 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पाचव्या दिवशी सर्वबाद 345 धावा करता आल्या. या डावात भारताकडून केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी शतके केली.

भारताने पाचव्या दिवसाची सुरुवात दुसऱ्या डावात 3 बाद 58 धावांपासून केली. यावेळी नाबाद असणारे अजिंक्य रहाणे आणि केएल राहुलने सकारात्मक सुरुवात केली होती. पण काही वेळानंतर रहाणेला 37 धावांवर असताना मोईन अलीने बाद केले.

त्याच्यापाठोपाठ लगेचच पहिल्या डावात अर्धशतक करणारा हनुमा विहारीही शून्य धावेवर बाद झाला. यानंतर मात्र रिषभ पंत आणि राहुलने भारताचा डाव सांभाळायला सुरुवात केली. या  दोघांनीही काही आक्रमक फटके खेळत भारताची विजयाची आशा कायम ठेवली होती.

या दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी संघर्ष करायला लावला. पण अखेर तिसऱ्या सत्रात केएल राहुलला बाद करत आदिल रशीदने ही जोडी तोडली. रशीदने आधी राहुलला आणि त्याच्या नंतर पंतलाही बाद करत भारताला संकटात आणले.

राहुलने 224 चेंडूत 149 धावा केल्या. यात त्याने 20 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच पंतने 146 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 114 धावा केल्या. या दोघांनी मिळून 6 व्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली.

या दोघांची विकेट गेल्यानंतर मात्र भारताच्या तळातल्या फलंदाजांनी लवकर विकेट गमावल्या. तळातल्या फलंदाजांपैकी रविंद्र जडेजा(13) आणि इशांत शर्मा(5) यांनी धावा केल्या.

तत्पूर्वी भारताने या डावात चौथ्या दिवशीच शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली होती.

इंग्लंडकडून या डावात अँडरसन(3/45), स्टुअर्ट ब्रॉड(1/43), सॅम करन(2/23), बेन स्टोक्स(1/60), मोईन अली(1/68) आणि अदिल रशीद(2/63) यांनी विकेट्स घेतल्या.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 332 धावा केल्या होत्या. या डावात मोईन अली(50), अॅलिस्टर कूक(71) आणि जॉस बटलर(89) यांनी अर्धशतके केली होती. तसेच भारताकडून जडेजाने 4 विकेट्स घेतल्या होत्या.

तर भारताने पहिल्या डावात हनुमा विहारी(56) आणि रविंद्र जडेजा(86*) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 292 धावा केल्या होत्या. या डावात इंग्लंडकडून अँडरसन, स्टोक्स आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर 40 धावांची आघाडी घेत इंग्लंडने दुसऱ्या डावात 8 बाद 423 धावांवर डाव घोषित केला होता. या डावात इंग्लंडकडून अॅलिस्टर कूक(147) आणि जो रुटने(125) शतके केली. या डावात भारताकडून जडेजा आणि विहारीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

हा सामना अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेणार आहे.

संक्षिप्त धावफलक:

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 332 धावा

भारत पहिला डाव – सर्वबाद 292 धावा

इंग्लंड दुसरा डाव – 8 बाद 423 धावा (घोषित)

भारत दुसरा डाव –  सर्वबाद 345 धावा

सामनावीर- अॅलिस्टर कूक: 218 धावा

मालिकावीर- सॅम करन: 272 धावा आणि 11 विकेट्स

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेम्स अँडरसन बनला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज

ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही

श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय

You might also like