जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलचे १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. या लीगमध्ये १२ वर्षांपासून दरवर्षी भारत तसेच परदेशातील खेळाडू मेहनत घेत आहेत. जेणेकरून त्यांना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून नाव कमावण्याबरोबरच आपल्या राष्ट्रीय संघातही स्थान मिळेल. परंतु काही खेळाडूंसाठी ही लीग खूपच वाईट सिद्ध झाली. अनेकांना संधीच मिळाली नाही, तर काहींना संधी मिळूनही त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही.
भारतीय क्रिकेट संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमधून राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. परंतु आज या लेखात आपण त्या ५ क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे नशीब आयपीएलमध्ये खराब राहिले.
१. बाबा अपराजित
बाबा अपराजित हा असा खेळाडू आहे, ज्याच्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने विश्वास दाखवत आपल्या संघात सामील केले होते. बाबा आयपीएल २०१२ मध्ये धोनीचा आवडता खेळाडू होता. परंतु बाबा केवळ ड्रेसिंग रूममध्ये बसून संधी मिळण्याची वाट पाहत बसला, जी त्याला मिळालीच नाही. बाबा त्या खेळाडूंपैकी एक आहे, जो १९ वर्षांखालील विश्वचषकात चर्चेचा विषय ठरला होता. २०१२मध्ये, तो उन्मुक्त चंदच्या नेतृत्वातील १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. त्याने भारतीय संघाला विजयी बनण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत १७१ धावा ठोकल्या होत्या तसेच ५ विकेट्सही घेतल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तान आणि उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध तो सामनावीर ठरला होता.
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वीच त्याने १७ वर्षांच्या वयात तमिळनाडू संघासाठी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे त्यानंतरपासून बाबाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले होते. तो घरेलू क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाचा नियमित सदस्य आहे. तरीही आयपीएलमध्ये या अष्टपैलू खेळाडूला कोणतीही संधी नाही मिळाली. तो काही आयपीएल संघांचा सदस्य राहिला. परंतु त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही.
बाबा चेन्नई सुपर किंग्ज आणि राजझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. त्याची घरेलू क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे. बाबाला जर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती, तर कदाचित त्याने इतर क्रिकेटपटूंप्रमाणे नाव कमाविले असते. परंतु त्याचे नशीब आयपीएलमध्ये खराब राहिले.
२. शाहबाज नदीम
शाहबाज नदीमदेखील अनलकी खेळाडूंपैकी एक आहे. तो आयपीएलसोबतच भारतीय क्रिकेटमध्येही अपयशी ठरला. परंतु त्याने घरेलू क्रिकेटमध्ये चांगले नाव कमाविले आहे. असे वाटत होते की तो येत्या काळात भारतीय संघात फिरकीपटू म्हणून प्रसिद्धी मिळवेल. परंतु त्याचे नशीब आयपीएलमध्येही खराब राहिले. नदीमने २०११मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
तो २०११ पासून २०१८ पर्यंत दिल्ली कॅपिटल्स (आधीचे दिल्ली डेअरडेविल्स) संघाकडून खेळला. त्यानंतर तो सनरायझर्स हैद्राबाद संघात सामील झाला. म्हणजेच तो आयपीएलचे एकूण ९ मोसम खेळला आहे. परंतु प्रत्येक मोसमात तो आपली छाप सोडण्यात अयशस्वी ठरला. अनेक संधी मिळूनही शाहबाज स्वत:ला सर्वोत्तम खेळाडू सिद्ध करू शकला नाही. आतापर्यंत खेळलेल्या ६४ आयपीएल सामन्यात त्याने केवळ ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
३. बेन कटिंग
आयपीएलमध्ये नशीब खराब ठरलेला तिसरा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा बेन कटिंग होय. आश्चर्याची बाब अशी की कटिंगसारखा धडाकेबाज खेळाडू आयपीएलमध्ये आपली कामगिरी दाखविण्यात मागे पडला. त्याने एकूण २१ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने एकूण २३८ धावाच केल्या. कटिंगने २०१४ साली राजस्थान रॉयल्स संघातून आपले आयपीएल पदार्पण केले होते. परंतु त्या मोसमात तो केवळ १ सामना खेळू शकला होता. २०१६ आणि २०१७ मध्ये तो सनरायझर्स हैद्राबादचा भाग होता. परंतु यादरम्यानही तो अनुक्रमे ४ सामने खेळला. त्यामध्येही तो फ्लॉप ठरला.
आयपीएल २०१८च्या मोसमात कटिंगला कोणता संघ घेणार असा प्रश्न होता. परंतु मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात सामील केले. अपेक्षा होती की मुंबईसारखा यशस्वी संघात येऊन कटिंग आपल्या फलंदाजीत सुधारणा करेल. परंतु इथेही त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०१८मध्ये त्याला अनेक संधी मिळाली. परंतु तो ९ सामने खेळत केवळ ९६ धावा करू शकला. त्यानंतर २०१९ मध्ये तो केवळ ३ सामने खेळला आणि १८ धावा केल्या. आता आयपीएल २०२० साठी मुंबई इंडियन्सने त्याला मुक्त केले आहे. अशाप्रकारे कटिंगला आयपीएल इतिहासात सर्वात अनलकी खेळाडूंमध्ये गणले जाऊ शकते.
४. नाथू सिंग
२०१५-१६च्या रणजी हंगामात नाथू सिंगने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले होते. त्याने त्यावेळी राजस्थान संघाकडून पहिल्या डावात दिल्लीविरुद्ध ८७ धावा देत ७ विकेट्स चटकावले होते. मुंबई इंडियन्सने त्याला २०१६ मध्ये आयपीएल लिलावात ३.२ कोटी रुपये देत आपल्या संघात सामील केले होते. तरीही, नाथूचे नशीब खराब ठरले कारण मुंबईने त्याला पदार्पणाची एकही संधी दिली नाही. त्यानंतर पुढील मोसमात त्याला गुजरात लायन्स संघाकडून खेळताना त्याने आयपीएलची सुरुवात केली. गुजरातने त्याला २ सामन्यात संधी दिली. त्याने २ सामन्यात ४ षटके टाकत केवळ १५ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली.
नाथूला संधी मिळाली असती, तर तो चमकदार कामगिरी करू शकला असता. आजही नाथूची टी२० आकडेवारी १९ सामन्यात ३० विकेट्स इतकीच आहे. परंतु आयपीएल लिलावात मुंबई आणि गुजरातने त्याला आपल्या संघात सामील केले खरे पण संधी न मिळाल्यामुळे तो आपला ठसा उमटवू शकला नाही.
५. ओएन मॉर्गन
आयपीएलमध्ये ५० पेक्षा अधिक सामने खेळणारा खेळाडू अपयशी ठरला, हे ऐकण्यात जरा खटकू शकते. परंतु हो असं झालंय ते इंग्लंडचा फलंदाज ओएन मॉर्गनबरोबर. मॉर्गनला आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. आयपीएलचे ६ मोसम खेळलेल्या मॉर्गनने ५२ सामन्यात केवळ ८५४ धावा केल्या आहेत. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २०१० साली २,२०,००० डॉलर्समध्ये आपल्या संघात सामील केले होते. तरीही, तो त्या सामन्यात केवळ ६ सामने खेळला आणि ३५ धावा केल्या.
परंतु २०११ आणि २०१३ मध्या मॉर्गनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात सामील केले. तिथे त्याला अधिक संधी मिळाल्या. त्याने त्या दोन हंगामात २६ सामने खेळले. तिथेही तो फ्लॉप ठरला. २०१५ आणि २०१६ मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने आपल्या संघात घेतले. त्याने तिथेही अपेक्षित कामगिरी केली नाही. परंतु २०१७ मध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाने त्याला वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात घेतले. परंतु तिथेही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पुढे तो २०१८ आणि २०१९ च्या मोसमात खेळू शकला नाही. परंतु २०२० च्या १३ व्या मोसमात तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. कोलतानाने त्याला ५.२५ कोटी रुपयांंना आपल्या संघात सामील केले आहे. आता या मोसमात तो चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.
ट्रेंडिंग लेख –
–कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
-सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
-कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन
महत्त्वाच्या बातम्या –
-३३ वर्षीय मॉर्गनने वाढवले रुटचे टेन्शन, आता मोठा विक्रमही धोक्यात
-३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने
-दरवर्षीप्रमाणेचं एवढे दिवस गायब झालेल्या धोनीचे सीएसकेच्या चाहत्यांना खास गिफ्ट, पहा काय आहे…