चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२२साठी सज्ज झाला आहे. चेन्नई संघ हा अनुभवी खेळाडूंनी भरलेला आहे. मात्र, संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी अधिक क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे या खेळाडूंना स्वत:ला सामन्यासाठी तयार करणे हे एक मोठे आव्हान असेल. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणचा असा विश्वास आहे की, चेन्नई सुपर किंग्जच्या आगामी हंगामात चांगली कामगिरी करण्याच्या आशा एमएस धोनी, अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा सारख्या खेळाडूंनी सामन्यासाठी काय तयारी केली आहे, त्यावर अवलंबून असतील.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आयपीएल २०२१ नंतर क्रिकेटचा कोणताही सामना खेळलेला नाही. अंबाती रायुडूने आंध्रप्रदेशसाठी विजय हजारे ट्रॉफीत काही सामने खेळले होते. दुसरीकडे रॉबिन उथप्पानेही केरळकडून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील काही सामने खेळले होते.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आयपीएल २०२२साठी चेन्नईबद्दल इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला की, “त्यांच्या सामन्यातील सातत्य, धोनी, रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांनी किती क्रिकेट खेळले असेल आणि ते कोणत्या आकारात आहेत, हा एकच प्रश्न असेल. त्यांचा नवा अष्टपैलू शिवम दुबे कशी कामगिरी करतो तेही आपण पाहणार आहोत.”
आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या शिवम दुबेला चेन्नईने आयपीएल २०२२च्या लिलावात ४ कोटी रुपयांमध्ये संघात घेतले होते.
याव्यतिरिक्त दीपक चाहरच्या अनुपस्थितीवरही इरफान पठाणने प्रतिक्रिया दिली. त्याला विचारण्यात आले की, चाहरची अनुपस्थिती चेन्नईसाठी मोठा धोका असेल का? याबद्दल बोलताना इरफान म्हणाला की, “कामगिरीतही मोठा फरक असेल. अनुभव खूप महत्त्वाचा असल्याने त्याच्या जागी हंगारगेकर कसे खेळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.”
दीपक चाहर दुखापतग्रस्त असूनही, इरफानचे मत आहे की, चेन्नईकडे एक सेट युनिट आहे. तो म्हणाला की, “सुरुवातीला दीपक चाहरची जागा घेणे कठीण जाईल, परंतु असे असतानाही, जर तुम्ही संघाकडे पाहिले, तर ते चांगल्याप्रकारे तयार आहेत. जर कोणी लिलावात त्यांच्या सर्वाधिक खेळाडूंना परत घेतले असेल, तर ते चेन्नईने. ते त्यांच्या ठरलेल्या संघासह गेले आहेत. त्यांनी त्यांच्या २०२१च्या विजयी संघातून खेळाडूंची निवड केली आहे. रॉबिन उथप्पा, रायुडू आणि ब्रावोला परत आणले. ऋतुराज गायकवाड, मोईन अली, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा हे आधीच तिथे होते. मी ज्यांची नावे घेतली आहेत, ते सर्वजण सुरुवातीच्या अंतिम ११ संघात खेळतात आणि स्वतःच मॅच विनर आहेत.”
आयपीएल २०२२चा पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएल २०२१चा अंतिम सामनाही चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
एकटी मुंबई इंडियन्स होम ग्राउंडवर खेळणार आयपीएल सामने, पण याचा त्यांना फायदा होणार? वाचा
‘तुम्हाला माझी परिस्थिती माहिती नाही’, यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक