भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग अनेकदा निर्भय शैलीत आपले निःपक्षपाती मत सर्वांसमोर मांडतो. आता युवराज सिंगने भारत-इंग्लंड संघात होणाऱ्या कसोटी मालिका संदर्भात देखील आपले मत मांडले आहे. युवराजने पहिला सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे खेळवला जाणार आहे.
युवराज सिंग म्हणाला की, भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांना इंग्लंडमध्ये नेले आहे. पण भुवनेश्वर कुमारसारखा स्विंग गोलंदाज इंग्लंडला गेला नाही. युवराज सिंग पुढे म्हणाला की, भुवनेश्वरसारखा गोलंदाज इंग्लंड मालिकेत खेळला पाहिजे, कारण स्विंग गोलंदाज तिथे अधिक प्रभावी ठरू शकतात.
युवराज सिंग टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, ‘आपल्याकडे अनेक सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. पण इंग्लंडमधील परिस्थिती अतिशय कठीण आहे. मला वाटते की, इंग्लंडमध्ये भारताला स्विंग गोलंदाजाची गरज आहे. त्यांना ड्यूक बॉल कसा स्विंग होतो, हे माहित असले पाहिजे. संघाकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा हे आहेत. भारतीय संघाला भुवनेश्वर कुमार सारख्या गोलंदाजाची गरज आहे.’
युवराज सिंगने पुढे म्हणाला की, ‘भुवनेश्वर कुमारलाही इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असल्याने तो संघासाठी अधिक महत्त्वाचा खेळाडू ठरला असता. भुवनेश्वर हा चेंडू स्विंग करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याला अनुभव देखील आहे आणि जर तो तंदुरुस्त असेल, तर त्याला इंग्लंडमध्ये भारतीय संघात संधी मिळायला हवी होती.’
भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. तो गेल्या काही वर्षापासून दुखापतीने त्रस्त होता. त्याचाच फटका त्याला बसला आहे.
भुवनेश्वर कुमारने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका डावात २ वेळा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. २०१४ मध्ये लॉर्ड्सवर त्याने ८२ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सेहवागने ट्विटरवर शेअर केला चक्क ‘फोन नंबर’, चाहतेही झाले चकीत
वॉर्नरचे साऊथच्या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकले पाय; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘हा’ भारतीय खेळाडू ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यात ‘हुकुमी एक्का’, ऑसी दिग्गजाचा दावा