भारतीय कसोटी संघ चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर असताना मर्यादीत षटकांचा भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक सर्वांसमोर आले आहे. या दौऱ्याचे प्रसारणकर्ता सोनी स्पोर्ट्सने वेळापत्रक घोषित केले आहे.
या दौऱ्यात ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल.
वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. तरी अजून सामन्यांच्या ठिकाणांबद्दल निर्णय झालेला नाही.
या मालिका सुरु असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारताला १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे.
त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू व्यस्त असणार आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा अशा काही खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. अशा परिस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी काही युवा खेळाडूंना भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात स्थान दिले जाऊ शकते.
तसेच विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन किंवा हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. श्रेयस अय्यर देखील नेतृत्वासाठी पर्याय आहे. पण सध्या तो खांद्याच्या दुखापतीतून सावरत असून त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध रहायचे असेल तर तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.
असा असेल भारताचा श्रीलंका दौरा
वनडे मालिका –
१३ जुलै – पहिला वनडे सामना
१६ जुलै – दुसरा वनडे सामना
१८ जुलै – तिसरा वनडे सामना
टी२० मालिका –
२१ जुलै – पहिला टी२० सामना
२३ जुलै – दुसरा टी२० सामना
२५ जुलै – तिसरा टी२० सामना
महत्त्वाच्या बातम्या –
नासिर हुसेननंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने देखील इंग्लिश खेळाडूंवर केली बोचरी टीका; म्हणाला…
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी केन विलियम्सनने भारतीय संघाबद्दल ‘असे’ व्यक्तव्य करुन जिंकली मने