भारत आणि बांग्लादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये खेळवला जाईल. कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यांमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. दोन्ही देशांदरम्यान एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 11 जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले.
हा मजबूत विक्रम असूनही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेशला हलक्यात घेऊ शकत नाही. नुकतेच बांग्लादेशने घरच्या मैदानावर पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला होता. बांग्लादेशचा संघ प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. भारत-बांग्लादेश मालिकेत काही मोठे विक्रमही होऊ शकतात. अशाच रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊया…
सचिन-द्रविड-गावस्कर यांच्या क्लबमध्ये विराटची एन्ट्री!
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये नवा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. किंग कोहलीने बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 152 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 9,000 धावा पूर्ण करेल. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजारांचा आकडा गाठणारा विराट हा चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर हेच करू शकले आहेत. विराटच्या नावावर सध्या 113 कसोटी सामन्यांमध्ये 49.15 च्या सरासरीने 8848 धावा आहेत.
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर सेहवागचा विक्रम
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणखी एक विक्रम करण्याच्या जवळ आहे. बांग्लादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत रोहितने एकूण 7 षटकार मारले तर तो महान भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडेल. वास्तविक, भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. ज्याने भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 90 षटकार ठोकले होते. रोहित शर्माने आतापर्यंत 54 कसोटी सामन्यांमध्ये 84 षटकार मारले आहेत.
विराट कोहली ब्रॅडमनलाही मागे टाकू शकतो
विराट कोहली 9 महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. विराट बांग्लादेशविरुद्ध खेळेल तेव्हा त्याची नजर डॉन ब्रॅडमनच्या विक्रमावर असेल. विराटच्या नावावर सध्या 29 कसोटी शतके आहेत, त्यामुळे तो ब्रॅडमनला मागे टाकण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. विराटने बांग्लादेशविरुद्ध शतक ठोकल्यास तो ब्रॅडमनचा 29 शतकांचा विक्रम मोडेल.
अश्विनला झहीरचा विक्रम मोडण्याची संधी आहे
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचा विक्रम मोडू शकतो. वास्तविक, झहीर हा भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. झहीरने 7 कसोटी सामन्यात 31 बळी घेतले. अश्विनने आतापर्यंत बांग्लादेशविरुद्धच्या 6 कसोटी सामन्यात 23 बळी घेतले आहेत. अश्विनने आगामी मालिकेत 9 विकेट घेतल्यास तो भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
हेही वाचा-
‘पुन्हा येणार नाही’, ग्रेटर नोएडाची ‘खराब व्यवस्था’ पाहून अफगाणिस्तान संघ संतप्त
हे दोन खेळाडू पुढे जाऊन भारताचे नेतृत्तव करणार; दिनेश कार्तिकची भविष्यवाणी
AFG vs NZ: पावसाचा एक थेंबही नाही, तरीही कसोटीचा पहिला दिवस ओल्या आउटफिल्डमुळे रद्द!