वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता केवळ एक महिना बाकी आहे. 18-22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंडचे संघ साऊथॅम्प्टनच्या मैदानावर कसोटीतील पहिल्या चॅम्पियनशीपसाठी भिडतील. भारतीय संघासाठी न्यूझीलंड विरुद्ध होणार सामना इतका सोपा होणार नाही, कारण न्यूझीलंड गोलंदाज इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर अधिक घातक ठरतील. विशेषत: डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनर भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. स्टीव स्मिथसारख्या दिग्गज फलंदाजाला त्रस्त करणारा वॅगनर विराट-अजिंक्य विरुद्धही शानदार कामगिरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वॅगनरचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने एक गोलंदाज निवडला आहे जो भारतीय फलंदाजांना नेटमध्ये विशेष सराव देऊ शकेल.
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघासोबत गुजरातचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्झन नागवासवाला राखीव खेळाडू म्हणून जाणार आहे. तो नेटमध्ये गोलंदाजी करताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून ते न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या आव्हानासाठी सज्ज होतील.
नागावासवाला हा नील वॅगनरसारखाच डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो बाऊन्सर फेकण्यात देखील निपुण आहे. नेटमध्ये वॅगनरच्या गोलंदाजी प्रमाणे विराटसह अन्य भारतीय फलंदाजांना सराव करता येईल. इनसाइड स्पोर्टशी बोलताना नागावासवाला म्हणाला, ‘मला अशा योजनेखाली गोलंदाजी करायला आवडते ज्यामध्ये फलंदाज अडकतात. मी नेटमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांविरुद्धही असेच करेन. मी त्यांच्यासाठी समस्या निर्माण करीन जेणेकरून ते सामन्यासाठी तयार असतील.”
नील वॅगनरने मागील 2-3 वर्षांत आपल्या कामगिरीत बरीच सुधारना केली आहे. त्याने आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना त्रस्त केले आहे. वॅगनरने 51 कसोटी सामन्यात 219 विकेट्स घेतलेल्या आहेत. वॅगनरने प्रत्येक संघाविरूद्ध शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यात 24 बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या 9 सामन्यात वॅगनरने 37 विकेट्स घेतल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 6 सामन्यांत 22 बळी घेतले आहेत. भारताविरुद्ध देखील वॅगनरने शानदार कामगिरी करत 5 सामन्यात 18 बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
फुटबॉलपटू राहुल चाहर आणि ज्योतिषी सौरभ तिवारी, मुंबई इंडियन्सने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
धोनीचा मोठा फॅन आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; म्हणतोय, ‘मला २०११ विश्वचषकातील विजयी षटकार आवडतो’