सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णित झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४०७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघ करत असताना पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १ षटक बाकी होते, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाने हस्तोंदलन करुन हा सामना अनिर्णित अवस्थेत थांबवण्याचा निर्णय घेतला.
भारताने दुसऱ्या डावात ५ बाद ३३८ धावा केल्या. या डावात आर अश्विन ३९ धावांवर आणि हनुमा विहारी २३ नाबाद राहिले. त्यांनी तिसरे सत्र पूर्ण खेळून काढत हा सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला.
या डावात रिषभ पंतने सर्वाधिक ९७ धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने ७७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड आणि नॅथन लायनने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने १ विकेट घेतली.
अश्विन-विहारीची चिवट झुंज –
या सामन्यातील सोमवारी शेवटचा दिवस असून भारताने विजयाच्या आशा कामय राखल्या आहेत. या दिवसाच्या शेवटच्या सत्रात दोन्ही संघ सामना आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताने ३२० धावांचा टप्पा पार केला असून अजून भारताला ८७ धावांची गरज आहे.
आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी भारताची बाजू लावून धरली असून त्यांनी तिसऱ्या सत्रात अजूनही विकेट गमावलेली नाही. त्यामुळे भारताच्या सामना अनिर्णित करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भारताने दुसऱ्या डावात १२७ षटकात ५ बाद ३२० धावा केल्या आहेत. अद्याप भारताला ८७ धावांची गरज आहे. सध्या अश्विन ३३ धावांवर तर विहारी १५ धावांवर नाबाद आहे.
अश्विन-विहारीचा संघर्ष –
तिसऱ्या सत्रात आर अश्विन आणि विहारी दोघेही हा सामना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसून आले आहेत. त्यांनी संथ खेळ करत ऑस्ट्रेलियावरील दबाव वाढवला असून आता या सामन्याती केवळ १५ षटके बाकी आहेत. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची तर भारताला १०२ धावांची गरज आहे.
भारताने दुसऱ्या डावात ११७ षटकात ५ बाद ३०५ धावा केल्या आहेत. अद्याप भारताला १०२ धावांची गरज आहे. सध्या अश्विन २८ धावांवर तर विहारी ७ धावांवर नाबाद आहे.
दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ५ बाद २८० धावा
भारतीय संघावर मैदानात स्थावलेले रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या विकेट गमावल्याने दबाव वाढला. असे असले तरी दुसऱ्या सत्राखेरपर्यंत अश्विन आणि विहारी या दोघांनी विकेट्स टिकवून ठेवल्या. त्यांनी पुजारा बाज झाल्यानंतर पुढच्या ७ षटकात ५ धावाच काढल्या. त्यामुळे दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ९६ षटकात ५ बाद २८० धावा झाल्या आहेत. अजूनही भारताला १२७ धावांची गरज असून सध्या विहारी ४ धावांवर आणि आर अश्विन ७ धावावंर नाबाद खेळत आहे.
पुजारा अर्धशतक करुन बाद –
रिषभ पंत पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही बाद झाल्याने भारताला दोन मोठे धक्के ५ व्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात बसले आहेत.
पंत बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने भारताच्या डावाची जबाबदारी घेतली. त्याने काही शानदार फटके मारले. त्याला हनुमा विहारी चांगली साथ देत होता. पण याचदरम्यान विहारीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यामुळे भारताचे मेडिकल स्टाफ मैदानावर आले. त्यांनी त्याच्यावर उपचार केल्याने विहारीने पुढे खेळणे सुरु ठेवले. पुढे पुजारा चांगला खेळत असतानाच ८९ व्या षटकात जोश हेजलवूडने टाकलेला एक सुरेख चेंडूने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे पुजाराला २०५ चेंडूत ७७ धावांवर असताना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याने या खेळीत १२ चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर आर अश्विन फलंदाजीसाठी आला
भारताने ९० षटकात ५ बाद २७५ धावा केल्या. अजूनही भारताला १३२ धावांची गरज असून सध्या विहारी ४ धावांवर आणि आर अश्विन २ धावावंर नाबाद खेळत आहेत.
पंत शतक ३ धावांनी हुकले –
पहिल्या सत्रातील लय रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने कायम राखली. दरम्यान पंत पाठोपाठ पुजारानेही ७३ व्या षटकात १७० चेंडूत अर्धशतक पूर्ण केेले. याबरोबरच पुजाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ६००० धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो ११ वा भारतीय आहे.
पंत आणि पुजाराने दुसऱ्या सत्रातही आक्रमक खेळ करत होते. त्यांनी दुसऱ्या सत्रातील पहिल्या ९ षटकात ४४ धावांची भागीदारी केली होती. मात्र ८० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंत झेलबाद झाला. त्याचा झेल बॅकवर्ड पाँइंटला पॅट कमिन्सने पकडला. त्यामुळे पंतला ९७ धावांवर विकेट गमवावी लागली. त्याने ही खेळी १२ चौकार आणि ३ षटकाराहा ११८ चेंडूत केली. तो बाद झाल्यानंतर हनुमा विहारी फलंदाजीसाठी आला.
भारताने ८१ षटकात ४ बाद २५० धावा केल्या आहेत. पुजारा ५८ धावांवर आणि विहारी ० धावांवर नाबाद आहे. भारताला अजूनही १५७ धावांची गरज आहे.
रिषभ पंतचे आक्रमक अर्धशतक –
भारताने पाचव्या दिवसाची सुरुवात २ बाद ९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. पण भारताला या दिवसाचा पहिला धक्का लवकर बसला प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे ३६ व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीविरुद्ध झेलबाद झाला. त्याचा झेल मॅथ्यू वेडने घेतला.
मात्र, तो बाद झाल्यानंतर रिषभ पंतने चेतेश्वर पुजाराची भक्कम साथ देताना आक्रमक खेळ केला. त्याने चौकार षटकारांची बरसात करताना त्याने ६४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आणि पुजाराने शतकी भागीदारी करताना पहिल्या सत्राखेरपर्यंत विकेट जाऊ दिली नाही. त्यामुळे भारताने पहिल्या सत्राखेर ७० षटकात ३ बाद २०६ धावा केल्या होत्या. पुजारा ४१ धावांवर आणि रिषभ पंत ७३ धावांवर नाबाद आहे.