भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यीत पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील भारताचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. असे असले तरी, काही भारतीय महिला खेळाडूंचे प्रदर्शन मात्र खूपच अप्रतिम राहिले आहे. मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताची १८ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष (richa ghosh) हिने तुफानी खेळी केली आणि १४ वर्षांपूर्वीचा भारतीय विक्रम मोडला.
उभय संघातील चौथा एकदिवसीय सामना मंगळवारी (२२ फेब्रुवारी) खेळला गेला. रिचा घोषने या सामन्यात अवघ्या २९ चेंडूत ५२ धावा केल्या. सामन्यात पावसामुळे अडथळा आला होता. त्यामुळे भारताला २० षटकांमध्ये १९२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. रिचा घोषने अर्धशतकी खेळी केली असली, तरी इतर खेळाडू मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकल्या नाहीत आणि भारतीय संघ पराभूत झाला. भारताने १७.५ षटकांमध्ये १२८ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. ऋचा घोषने अवघ्या २६ धावांमध्ये स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले होते.
रिचा आता भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारी खेळाडू ठरली. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तिला अवघे २६ चेंडू लागले. जागतिक क्रिकेटमध्ये फक्त ६ अशा महिला खेळाडू आहेत, ज्यांना २६ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये एकदिवसीय अर्धशतक पूर्ण करता आले आहे. या कामगिरीसोबतच रिचाने भारतीय महिला संघाच्या रुमेली धर हिचा १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. रुमेली धरने २००८ मध्ये २८ चेंडूंमध्ये श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना अर्धशतक पूर्ण केले होते. आता रिचा या यादीत पहिल्या क्रमांकावर आली आहे.
रिचा घोषने न्यूझीलंडविरुद्धच्या या एकदिवसीय सामन्यात केलेल्या ५२ धावांमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. आता ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनली आहे. यापूर्वी इतर यष्टीरक्षक फलंदाजांनी एकत्र मिळून ४ एकदिवसीय षटकार मारले आहेत. याचाच अर्थ असा होतो की, एकाच एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू रिचा घोषने दोन मोठ्या विक्रमांची नोंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावून फसले आयपीएल संघ; वाचा सविस्तर
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला…
वयाच्या ३१ व्या वर्षी ‘या’ महिला भारतीय सलामीवीराने क्रिकेटला केला अलविदा, अशी राहिलीय कारकिर्द