भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध ब्रिस्टल येथे कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेल्या भल्यामोठ्या धावसंख्येला उत्तर देताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यातून कसोटी पदार्पण करणारी युवा सलामीवीर शेफाली वर्मा हिची शतक झळकावण्याची संधी हुकली.
सन २०१९ मध्ये भारतीय संघाच्या टी२० संघात प्रवेश केलेल्या शेफाली वर्माने बुधवारपासून (१६ जून) इंग्लंड विरुद्ध सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारताकडून पदार्पण केले. ती भारताची ८६वी महिला कसोटीपटू ठरली. तिच्यासोबत तानिया भाटिया, स्नेह राणा, दीप्ती शर्मा व पुजा वस्त्रकार यांनीदेखील भारतीय महिला संघाचे कसोटीपटू होण्याचा मान मिळवला.
पहिल्या डावात तडाखेबंद खेळी
इंग्लंड संघाने आपला पहिला डाव ९ बाद ३९६ धावांवर घोषित केला. त्यानंतर, भारतीय संघासाठी स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांनी सलामी दिली. इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांना नामोहरम करत दोघींनी वैयक्तिक अर्धशतके देखील पूर्ण केली. शेफाली आक्रमक फलंदाजीने डावाची सूत्रे हाती घेत शतकाकडे आगेकूच करताना दिसून आली. मात्र, ९६ धावांवर खेळत असताना केट क्रॉसच्या चेंडूवर उंचावून फटका मारण्याच्या नादात ती ऍना श्रबसोलेच्या हाती झेल देऊन माघारी परतली.
यामुळे, तिची पदार्पणात शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळाला नाही. तसेच, ती देशासाठी सर्वात कमी वयात कसोटी शतक झळकावण्यापासून ती वंचित राहिली.
स्मृती आणि शेफालीची विक्रमी भागीदारी
स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांनी सलामीला १६७ धावांची भागीदारी करून भारतासाठी सर्वाधिक धावांची सलामी देण्याचा विक्रम केला. त्यांनी गार्गी बॅनर्जी व संध्या अग्रवाल यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९८४ मध्ये केलेला १५३ धावांचा विक्रम मागे सोडला.
महत्वाच्या बातम्या:
न्यूझीलंड संघाचे तीन हुकमी एक्के, ज्यांच्यापासून भारताला अंतिम सामन्यात राहावे लागणार सावध
PSL: शान मसूदच्या खेळीने मुलतान सुलतान विजयी, तर क्वेटा ग्लॅडियेटरचे आव्हान संपुष्टात
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”