जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जूनपासून इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ या सामन्यात दोन हात करतील. भारतीय संघाला या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या काही ठराविक खेळाडूंपासून सावध रहावे लागेल, जे कधीही सामन्याचे चित्र पालटण्यात सक्षम आहेत. या लेखातून आपण याच तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
१)केन विलियम्सन- न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनकडून भारतीय संघाला जास्त धोका आहे. विलियम्सन सध्याचा क्रिकेटमधला एक महत्वाचा खेळाडू आहे. विलियम्सन न्यूझीलंड संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५८.३५च्या सरासरीने एकूण ८१७ धावा केल्या आहेत. तसेच आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने ८४ कसोटी सामन्यात ७१२९ धावा केल्या आहेत. त्यामुळे येत्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विलियम्सनला रोखण्यासाठी भारताला खास रणनिती आखावी लागेल.
२)ट्रेंट बोल्ट- न्यूझीलंड संघाचा डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्ट चेंडू स्विंग करण्यामध्ये तरबेज आहे. बोल्टने आजवर खूप वेळा भारतीय फलंदाजांना आपल्या स्विंगमध्ये अडकवले आहे. गेल्या न्यूझीलंड दौऱ्यावर बोल्टने भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. बोल्टने आजवर न्यूझीलंड संघासाठी ७२ कसोटी सामन्यात २८७ गडी बाद केले आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना बोल्टविरुद्ध संयमाने आणि एकाग्रतेने फलंदाजी करावी लागेल.
३)नील वॅग्नर- ‘आखूड टप्या’च्या चेंडूसाठी प्रसिद्ध असलेला नील वॅग्नर स्विंग करण्यात सुद्धा पटाईत आहे. वॅग्नरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात स्टीव स्मिथला आपल्या भेदक गोलंदाजीने अक्षरशा: रडवले होते. वॅग्नर सुद्धा डावखुरा गोलंदाज असून भारताच्या उजव्या हाताच्या फलंदाजांना त्रास देऊ शकतो. वॅग्नरने आजवर न्यूझीलंड संघासाठी ५३ कसोटी सामन्यात २२६ गडी बाद केले आहे. न्यूझीलंड संघासाठी वॅग्नरने नेहमीच कठीण प्रसंगात गडी बाद करून दिले आहे. त्यामुळेच अंतिम सामन्यात तो भारतीय संघासाठी एक घातक गोलंदाज ठरू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
PSL: शान मसूदच्या खेळीने मुलतान सुलतान विजयी, तर क्वेटा ग्लॅडियेटरचे आव्हान संपुष्टात
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा