कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाविश्वावर अनेक बंधने लादली गेली आहेत. क्रिकेटदेखील यापासून निराळे राहिले नाही. सर्व प्रमुख स्पर्धा आणि मालिकांवेळी संघांना जैव प्रतिबंधक वातावरणात म्हणजेच बायो-बबलमध्ये राहणे अनिवार्य झाले आहे. तत्पुर्वी खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाते आणि यात निगोटिव्ह आढळलेल्या खेळाडूंनाच जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जातो.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्याआधी गुरुवारी (२८ जानेवारी) भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना कुटुंबीयांसोबत चेन्नईला जाण्याची परवानगी दिली आहे.
यानंतर भारतीय खेळाडू ६ दिवस विलगीकरणात राहणार आहेत. यादरम्यान त्यांच्या अजून २ कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. २ फेब्रुवारीपासून भारतीय खेळाडू सरावास सुरुवात करणार आहेत. या दोन्ही चाचण्या उत्तीर्ण करणाऱ्या खेळाडूंनाच सराव करण्याची संधी दिली जाईल.
बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली माहिती
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “नियमानुसार क्वारंटाईन कालावधीतही खेळाडूंची पहिली RT-PCR चाचणी करण्यात आली आहे आणि अजून दोन चाचणी होणे शिल्लक आहे. पहिल्या चाचणीत सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता सर्व खेळाडूंना त्यांच्या खोलीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.”
निक वेब आणि सोहम देसाई या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीय खेळाडू व्हिडीओ कॉलद्वारे आपापल्या खोलीत व्यायाम करत आहेत.
रहाणे, रोहित, हार्दिक, साहा कुंटुंबीयांसोबत पोहोचले चेन्नईत
बीसीसीआयने या दौऱ्यावर खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. कारण भारतीय खेळाडू मागील ६-७ महिने कुटुंबीयांपासून दूर आहेत. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक वृद्धिमान साहा, अष्टपैलू हार्दिक पांड्या हे सर्व आपापल्या कुटुंबीयांसोबत चेन्नईत दाखल झाले आहेत. तिथे त्यांना चेन्नईच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तयारी जोमात! भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती
ऑस्ट्रेलियामधील वर्णभेदाच्या घटनेतून धडा घेत इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक