आयपीएल २०२१ चा १४ वा हंगाम भारतात खेळला जाणार होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना कोरोना संक्रमण झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यात स्थगित करण्यात आली. आता याच १४ व्या हंगामातील उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवले जात आहेत. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. यासाठी मुंबई इंडियंन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ यूएईत दाखल झाले आहेत. दरम्यान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर उर्वरित हंगामासाठी तयारी करताना दिसला आहे.
अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मुंबईच्या संघाने समाजमाध्यमांवर त्याचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी तयारीला सुरूवात केली आहे. मुंबईचा संघ सध्या अबू धाबीमध्ये आहे आणि त्यांचा सात दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहे. या दरम्यान अर्जुन तेंडुलकरही त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.
मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या विलगीकरणातील खेळाडूंचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत अर्जुन तेंडुलकरही आहे. त्याव्यतिरिक्त व्हिडिओत अनमोलप्रीत सिंग, मोहसिन खान, धवल कुलकर्णी आणि अनुकुल राॅय व्यायाम करताना दिसत आहेत.
अर्जुन तेंडुलकरला हंगामाच्या सुरूवातीच्या सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जर मुंबई इंडियन्स संघाला वाटले तर अर्जुन पहिल्यांदा यूएईत आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. युएईमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात १९ सप्टेंबरला होणार आहे. मुंबईच्या संघाने हंगामाच्या सुरूवातीला चांगले प्रदर्शन केले आहे. संघाने खेळलेल्या ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. उर्वरित सामन्यात त्यांचे प्रदर्शन कसे राहते हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
AK-47 हाती घेऊन अफगाणी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसले तालिबानी, माजी क्रिकेटरही दिसला सोबत
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन