इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उत्तरार्धातील पहिले ‘डबल हेडर’ सामने शनिवारी (२५ सप्टेंबर) रोजी खेळले जातील. दिवसातील पहिल्या सामन्यात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेला दिल्ली कॅपिटल्स आणि पाचव्या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने येतील. अबुधाबी येथे होणारााा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होईल.या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड असेल याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
दिल्लीचा संघ मजबूत
आयपीएल उत्तरार्धातील आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत तळाच्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले होते. कगिसो रबाडा व एन्रिक नॉर्किए या वेगवान गोलंदाजांनी आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले होते. पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने फलंदाजीत योगदान देत दिल्लीची चिंता दूर केली आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन व कर्णधार रिषभ पंत त्यांनीदेखील पूर्वार्धातील आपला फॉर्म कायम ठेवला असून, संघाला युवा पृथ्वी शॉकडून आणखी अपेक्षा असतील.
राजस्थानकडून उंचावल्या अपेक्षा
आयपीएल २०२१ चा पूर्वार्ध संपताना राजस्थान संघ पाचव्या स्थानी होता. पंजाब विरुद्धच्या सामन्यात उत्तरार्धाची सुरुवात केल्यानंतर राजस्थान संघ पराभवाच्या छायेत होता. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी केवळ ४ धावा हव्या असताना, युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने राजस्थासाठी संकटमोचकाची भूमिका बजावत संघाला दोन धावांनी थरारक विजय मिळवून दिला. एविन लुईस, लियाम लिव्हींगस्टोन व मुस्तफिझुर रहमान या विदेशी खेळाडूंची कामगिरी राजस्थानसाठी महत्त्वपूर्ण राहील. पहिल्याच सामन्यात चमकलेल्या यशस्वी जयस्वाल व महिपाल लोमरोर यांना पुन्हा एकदा अशीच कामगिरी करावी लागेल. कर्णधार संजू सॅमसन फॉर्मत येणे राजस्थानसाठी आवश्यक आहे.
दिल्लीची संभावित प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार), शिमरन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, कगिसो रबाडा, एन्रिक नॉर्किए व आवेश खान
राजस्थानची संभावित प्लेइंग इलेव्हन-
यशस्वी जयस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हींगस्टोन, महिपाल लोमरोर, राहुल तेवतिया, रियान पराग,ख्रिस मॉरिस, मुस्तफिझुर रहमान, चेतन सकारिया व कार्तिक त्यागी.