मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचलेल्या चार संघांची नावे आता पुढे आली आहे. शनिवारी (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्लेऑफमधील प्रवेश पक्का झाला. त्यापूर्वीच गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी प्लेऑफमधील जागा पक्की केली होती.
आयपीएलच्या या हंगामात (IPL 2022) एकूण १० संघ आमने-सामने आले होते. या १० संघांमधून आता गुजरात (Gujarat Titans), लखनऊ (Lucknow Super Giants), राजस्थान (Rajasthan Royals) आणि बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघांनी हंगामातील ८ किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकून अंतिम ४ मधील जागा पक्क्या केल्या आहेत.
आता गुणतालिकेतील स्थानांचा विचार करता गुजरात टायटन्स अव्वल क्रमांकावर आहे आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ पहिल्या क्वालिफायर सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेले लखनऊ सुपर जायंट्स आणि चौथ्या क्रमांकावरील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन संघ एलिमिनेटर सामन्यात आमने-सामने असतील. क्वालिफायरचा पहिला सामना आणि एलिमिनेटर सामना कोलकातामधील ईडन गार्डन मैदानात अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी होईल.
यानंतर क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि एलिमिनेटरच्या सामन्यातील विजेता संघ यांच्यात २७ एप्रिलला दुसऱ्या क्वालिफायरचा सामना होईल. या सामन्यानंतर २९ मे रोजी पहिल्या क्वालिफायर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यांतील विजेते संघ अंतिम सामन्यात भिडतील. दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
राजस्थान एकमेव विजेता संघ
या हंगामातील विशेष गोष्ट अशी की गेल्या १२ वर्षांत विजेतेपद जिंकलेल्या एकाही संघाने प्लेऑफमध्ये (IPL 2022 Plyaoffs) प्रवेश केलेला नाही. यावर्षी प्लेऑफ खेळणाऱ्या संघांमध्ये केवळ राजस्थान रॉयल्स असा संघ आहे, ज्यांनी आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. राजस्थानने सर्वात पहिल्या आयपीएल हंगामाचे म्हणजेच २००८ हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. त्यामुळे यंदा त्यांच्याकडे दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याची संधी असणार आहे.
तसेच बेंगलोरने तीनवेळा अंतिम सामना खेळला आहे, पण त्यांना अद्याप विजेतेपद जिंकता आलेले नाही. तसेच लखनऊ आणि गुजरात हे दोन्ही संघ यंदा नव्याने स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे बेंगलोर, गुजरात आणि लखनऊ यांना पहिली आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
आयपीएल २०२२ प्ले-ऑफ सामने
क्वालिफायर १
गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स – २४ मे २०२२, कोलकाता, संध्या. ७.३० वा.
एलिमिनेटर
लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २५ मे २०२२, कोलकाता, संध्या. ७.३० वा.
क्वालिफायर २
क्वालिफायर १ पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता संघ – २७ मे २०२२, अहमदाबाद, संध्या. ७.३० वा.
अंतिम सामना
क्वालिफायर १ विजेता वि. क्वालिफायर २ विजेता, २९ मे २०२२, अहमदाबाद, रात्री ८.०० वा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अन् टीम इंडियापासून फक्त एक पाऊल दूर असलेला योगेश ताकवले अचानक गायब झाला
पाकिस्तानचा एक असा कर्णधार, ज्याचे आजोबा उत्तर प्रदेशमधून झाले होते ग्रामपंचायत सदस्य
सत्तरच्या दशकात ‘या’ भारतीय फिरकीपटूची होती भलतीच दहशत, आजही विक्रम आहेत अबाधित