गोवा दि. ७ जानेवारी : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या पर्वातील शुक्रवारच्या लढतीत गुणतालिकेत तळाला असलेल्या एससी ईस्ट बंगालने गतविजेता मुंबई सिटी एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले.
संपूर्ण सामन्यातील खेळ पाहता मुंबई सिटीने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले तरी प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. गतविजेत्यांनी सर्वाधिक वेळ (७१ टक्के) चेंडूवर ताबा राखला. आठ पेनल्टी कॉर्नर मिळूनही मुंबईला त्याचे गोलांमध्ये रूपांतर करता आले नाही. पासेस देण्यासह (५०३-२०६) तसेच अचूकपणे पास देण्यातही (७८ टक्के-५३ टक्के) मुंबई सिटीने आघाडी घेतली. एससी ईस्ट बंगालने केवळ प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण रोखले नाही तर त्यांना गोल करण्यापासून रोखले. त्यांचा बचाव इतका प्रभावी ठरला की, ३०व्या मिनिटापर्यंत इगोर अँग्युलो वगळता मुंबई सिटीच्या एकाही स्ट्रायकरला अचूक फटका लगावता आला नाही.
मध्यंतरानंतर मुंबई सिटीने गियर बदलताना काही बदल केले. ५१व्या मिनिटाला रेनियर फर्नांडेसच्या पासवर कॅसिओ गॅब्रिएलने पेनल्टी क्षेत्रात धडक मारली. मात्र, फाऊल झाल्याने त्यांन पेनल्टी नाकारण्यात आली. सामना संपायला सहा मिनिटे शिल्लक असताना अरिंदम भट्टाचार्यने सुरेख चाल रचली. मात्र, संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरला. यावेळी मुंबई सिटीच्या बचावफळीने चांगल्या प्रकारे चेंडू क्लियर करताना पुढील धोका टाळला.
ईस्ट बंगालविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीमुळे मुंबई सिटीला एका गुणावर समाधान मानावे लागले. गुरुवारच्या एका गुणासह हैदराबाद एफसीला मागे टाकून त्यांनी १० सामन्यांतून १७ गुणांसह पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली. सलग चार सामन्यांतील त्यांची ही एकूण दुसरी बरोबरी आहे.
दुसरीकडे, १० सामन्यानंतरही एससी ईस्ट बंगालची विजयाची प्रतीक्षा कायम आहे. हैदराबाद एफसीनंतर बंगलोर एफसी पाठोपाठ मुंबई सिटी एफसीला रोखून त्यांनी बलाढ्य संघांना चांगलेच झुंजवले. मुंबईविरुद्धची त्यांची एकूण सहावी आणि सलग तिसरी बरोबरी आहे. उर्वरित ४ सामन्यांत त्यांना पराभव पाहावा लागला आहे.