चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा जोर लावताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दिवशी तब्बल १९ पदके मिळविली. जलतरणमध्ये ८, कुस्तीमध्ये ५, टेबलटेनिसमध्ये ४ तर वेटलिफ्टिंगमध्ये २ पदके मिळविताना तामिळनाडू आणि हरयाणा या दोन संघाना खूप मागे सोडले. आजच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी डंका वाजविताना, सर्वच खेळांत असलेली आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.
जलतरणामध्ये ऋषभ दासची सोनेरी हॅट्ट्रिक
मुलांच्या ५० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राचा ऋषभ दास हा विजेतेपदाचा मानकरी ठरला. त्याने ही शर्यत २६.४९ सेकंदात पूर्ण केली. पाठोपाठ त्याने शंभर मीटर फ्रीस्टाईल शर्यत ५२.०६ सेकंदात जिंकली. त्याने श्लोक खोपडे, सलील भागवत व रोनक सावंत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांना हे शर्यत जिंकण्यासाठी तीन मिनिटे ५६.९९ सेकंद वेळ लागला.
ऋजुता राजाज्ञ हिला दुहेरी मुकुट ; महाराष्ट्राला आठ पदकांची कमाई
महाराष्ट्राच्या ऋजुता राजाज्ञ हिने ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ३१.०४ सेकंदात पार केले होते. पुण्याच्या या खेळाडूने काल पन्नास मीटर बटरफ्लाय शर्यतीतही विजेतेपद मिळविले होते. सलील भागवत याने १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५६.८५ सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या रोनक सावंत याला कास्यपदक मिळाले त्याला हे अंतर पार करण्यासाठी चार मिनिटे ६.७२ सेकंद वेळ लागला.
मुलींच्या १०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या अलिफिया धनसुरा हिने रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यासाठी ५९.९८ सेकंद वेळ लागला. ४०० मीटर्स वैयक्तिक मिळाले शर्यतीत महाराष्ट्राची राघवी रामानुजन हिला कांस्यपदक मिळाले. तिने ही शर्यत पाच मिनिटे २३.८० सेकंदात पूर्ण केली. महाराष्ट्राने आज दिवसभरात चार सुवर्ण दोन रौप्य व दोन कास्य अशी आठ पदकांची कमाई केली.
कुस्तीत वीटभट्टी कामगाराच्या मुलाचे सोनेरी यश
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्ती आखाड्यात सलग तिसर्या दिवशी महाराष्ट्राच्या मल्लांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. ५१ किलो वजनी गटात कोल्हापूरच्या सोहम कुंभारने उत्तरप्रदेशच्या अनुज यादवला अखरेच्या क्षणापर्यंत चिवट झुंज देत सोनेरी यश खेचून आणले. ७१ किलो गटात सोमराज मोरेने, ६५ किलो वजनी गटात तनीश कदमने रौप्य तर मुलींच्या ६९ कि.वजनी गटात तृप्ती भवरने कांस्यपदकाची कमाई केली.
स्पर्धेच्या तिसरा दिवसही महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिन ठरला. ५१ किलो वजनी गटात अंतिम लढतीत बेळगांवच्या सेनादलाच्या कुस्ती केंद्रात सराव करणार्या १६ वर्षीय सोहमने उत्तरप्रदेशच्या अनुज यादवला ५-४ गुणांनी पराभूत करीत सुवर्ण पदक पटकावले. २-२ बरोबरी केल्यानंतर प्रथमच खेलो इंडिया खेळणार्या सोहमने आक्रमक कुस्ती खेळत सोनेरी यशाला गवसणी घातली. कोल्हापूरजवळील म्हाकवे गावात सोहमचे वडिल सुनील कुंभार हे वीट भट्टी कामगार आहेत. पर्दापणातील खेलो इंडिया स्पर्धेत सोहमने सुवर्णपदकाची चमकदार कामगिरीचे केली आहे.
सोमराज मोरे, तनीश कदमची रूपेरी कामगिरी, तृप्ती भवरला कांस्य
७१ किलो गटात सातारा येथील सोमराज मोरेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तो चंदिगडच्या साहिलकडून ४-५ गुणांनी पराभूत झाला. पुण्यातील बुचडे कुस्ती केंद्रात सराव करणार्या सोमराजने दुसर्या फेरीत आघाडी घेतली होती. शेवटच्या मिनिटांत साहिलने बचावात्मक पवित्रा घेतल्याने सोमराजचा पराभव झाली.
६५ किलो वजनी गटात तनीश कदम अंतिम फेरीत प्रभाव दाखवू शकला नाही. दिल्लीच्या सागरने त्याचा १२-१ गुणांनी पराभव केली. मुलींच्या ६९ किलो वजनी गटात तृप्ती भवरने कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारली. हिमाचलच्या कनिकावर संभाजीनगरच्या तृप्तीने १२-१ गुणंनी दणदणीत विजय संपादन केला. पदकविजेत्या कुस्तीगीरांचे महाराष्ट्राचे पथकप्रमुख विजय संतान, अरूण पाटील, प्रशिक्षक शिवाजी कोळी, दत्ता माने, संदिप वांजळे व शबनब शेख यांनी अभिनंदन केले आहे.
खो खो मध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल
मदुराई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील खो-खो मध्ये महाराष्ट्राने अपेक्षित प्रमाणे मुले व मुली या दोन्ही गटात अंतिम फेरीकडे वाटचाल केली आणि दुहेरी मुकुटाच्या संधी निर्माण केल्या.
मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कर्नाटक संघाचा २९-२३ असा एक डाव सहा गुणांनी दणदणीत पराभव केला. त्याचे श्रेय भरत सिंग (दोन मिनिटे) अजय कश्यप (दोन मिनिटे २० सेकंद), देवांग गांदेकर (तीन गडी व पावणे दोन मिनिटे), चेतन बिका (चार गडी) यांनी केलेल्या कौतुकास्पद खेळास द्यावे लागेल.
मुलींच्या गटात महाराष्ट्राने गुजरात संघावर २७-१६ एक डाव ११ गुणांनी एकतर्फी विजय नोंदविला. त्यावेळी महाराष्ट्राकडून सानिका चाफे (एक मिनिट ५५ सेकंद), संध्या सुरवसे (दोन मिनिटे), प्रीती काळे (अडीच मिनिटे), संपदा मोरे (३ गडी) व (दीड मिनिटे), दीपाली राठोड (दोन मिनिटे) यांनी शानदार कामगिरी केली.
टेबलटेनिसमध्ये महाराष्ट्राला २ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर आणि सायली वाणी यांच्या जोडीने महाराष्ट्राच्याच तनिशा कोटेचा आणि रिशा मीरचंदानी यांच्या जोडीला ६-११, ११-७,११-९,११-६ असे पराभूत करताना सुवर्ण पदक कमावले. अंतिम लढतीत पराभूत झाल्याने तनिशा आणि रिशाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य लढतीमध्ये तनिषा कोटेचा व रिशा मीरचंदानी यांनी हरयाणाच्या सुहाना सैनी व प्रितोकी चक्रवर्ती यांना तर पृथा वर्टीकर आणि सायली वाणी यांच्या जोडीने पश्चिम बंगालच्या सेन्ड्रीला दास, शुभंक्रिता दत्ता यांच्या जोडीला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राच्या सायली वाणीने पश्चिम बंगालच्या नंदिनी सहाला ८-११, ८-११,६-११, ११-८, ११-६, ११-०, ११-६ असे पराभूत करताना सुवर्णपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत सायलीकडून पराभूत झालेल्या पृथा वर्टीकरला कांस्य पदक मिळाले.
अंकुर तिवारी, सानिध्य मोरे यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंग मधील आपला दबदबा कायम ठेवला. आज अंकुर तिवारी याने १०२ किलो वजनी गटात तर सानिध्य मोरे याने ८९ किलो गटात रौप्य पदक जिंकले.
अंकुर याने १०२ किलो गटात स्नॅचमध्ये १२४ किलो तर क्लीन व जर्क मध्ये १५५ किलो असे एकूण २७९ किलो वजन उचलले. त्याचे सुवर्णपदक केवळ एका किलोने हुकले. आंध्र प्रदेशच्या सीएच वामसी याने २८० किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. अंकुर याचे या स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रीय युवा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्याची आशियाई स्पर्धेसाठी रशियामध्ये झालेल्या प्रशिक्षण शिबिरातही निवड झाली होती. तो मुंबईचा खेळाडू असून गेले तीन वर्षे तो संभाजीनगर येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात तृप्ती पराशर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
सानिध्य याने ८९ किलो गटाच्या स्नॅचमध्ये १३५ किलो तर क्लीन व जर्क मध्ये १५६ किलो असे एकूण २९१ किलो वजन उचलले. त्याने आतापर्यंत खेलो इंडिया स्पर्धेमध्ये एक सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले आहे. त्याने युवा राष्ट्रीय स्पर्धेतही सोनेरी कामगिरी केली होती तर कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला कांस्य पदक मिळाले होते. त्याचे वडील संजय मोरे हेच त्याचे प्रशिक्षक असून तो कल्याण येथे सराव करतो. तो जीवनदीप महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. त्याची बहीण शिवानी हीदेखील राष्ट्रीय वेटलिफ्टर आहे.
बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत
अत्यंत अतितटीच्या लढातीत महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सूरी यांनी उत्तराखंडच्या गायत्री रावत व मान्सा रावत यांचे आव्हान २१-१८, १६-२१, २२-२० असे मोडून काढताना बॅडमिंटनच्या मुलींच्या गटातील दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिला गेम महाराष्ट्राने जिंकल्यानंतर उत्तराखंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करताना दुसरा गेम जिंकला. मात्र, तिसऱ्या गेममध्ये श्रावणी आणि तारिणी यांनी योग्य समन्वय राखताना आक्रमक खेळ करून सामना जिंकला.
मुलीच्या एकेरीच्या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या निशा भोयटेला आंध्र प्रदेशच्या टी. सूर्या चरिष्मा हिने १३-२१, १६-२१ असे पराभूत केले. यामुळे मुलीच्या एकेरीतील महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.
तनिष्क आणि काहीरची जोडी टेनिसमध्ये अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या तनिष्क जाधव आणि काहीर वारीक यांच्या जोडीने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना तामिळनाडूच्या कावीन कार्तिक आणि ए. सिवा गुरु यांच्या जोडीला ६-२, ६-४ असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तनिष्क आणि काहीर यांनी सुरेख समन्वय राखताना जोरदार फोरहॅन्डच्या फटके मारताना पॉईंट्सची कमाई केली. दुसऱ्या उपांत्य फेरीत पंजाब आणि तामिळनाडू यांची लढत होवून, या लढतीचा विजेत्याचे आव्हान अंतिम फेरीत महाराष्ट्रासमोर असणार आहे.