कर्नाटक रणजी संघाचा खेळाडू कृष्णप्पा गौतमने सर्वाचे लक्ष वेधले आहे. रणजी ट्रॉफी २०२२चा तिसरा उपांत्यपूर्व सामना कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांच्यात खेळला गेला. उत्तर प्रदेशने हा सामना जिंकून उपांत्य सामन्यात स्थान बनवले. कृष्णप्पाने या सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या १२ धावांची खेळी केली, पण यादरम्यान त्याने एक असा शॉट मारला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
उत्तर प्रदेश संघाने सर्वप्रथम या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटकच्या सात विकेट्स पडल्या होत्या आणि संघाची धावसंख्या २१३ धावा होती. त्यांचा सलामीवीर रवीकुमारने ५७ धावांची महत्वाची खेळी केली, पण इतर सर्व खेळाडू धावा करण्यासाठी झगडतानाच दिसले.
कर्नाटक संघ ठराविक अंतराने विकेट्स गमावत राहिला, पण यादरम्यान कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) १२ धावा करून सर्वत्र चर्चेत आला. गौतमने त्याच्या या छोट्याश्या खेळीदरम्यान एक असा षटकार मारला, जो पाहून सर्वजण हैराण झाले. शिवम मावीच्या चेंडूवर त्याने ‘नो लूक सिक्स’ मारला. म्हणजेच त्याच्या बॅटला लागून चेंडू एकदा हवेत गेल्यानंतर त्याने पुन्हा त्याच्याकडे पाहिले देखील नाही. गौतमला पूर्ण आत्मविश्वास होता की, मारलेला चेंडू हा थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/ManviNautiyal/status/1534050338457927680?s=20&t=uqWFt9v1tLBLznJchvliIw
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर उत्तर प्रदेशने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटक संघ २५३ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशने पहिल्या डावात अवघ्या १५५ धावा केल्या गेल्या. पहिल्या डावात जरी कर्नाटक आघाडीवर असला, तरी दुसऱ्या डावात त्यांना ही आघाडी कायम ठेवता आली नाही.
दुसऱ्या डावात कर्नाटकने अवघ्या ११४ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या आणि उत्तर प्रदेशला विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या डावात उत्तर प्रदेशचा कर्णधार करण शर्मा (१६३ चेंडूत ९३ धावा) आणि प्रियम गर्ग (६० चेंडूत ५२ धावा) यांनी महत्वाचे प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. २१३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उत्तर प्रदेशला ६५.२ षटके फलंदाजी करावी लागली. आता उत्तर प्रदेश, बंगाल, मुंबई आणि मध्य प्रदेश हे चार संघ उपांत्य सामन्यांमध्ये आमने- सामने असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Ranji Trophy 2022 । खुद्द क्रीडामंत्र्यानेच शतक झळकावत बंगालला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं