मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र, उत्तम कामगिरी करूनही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. भारतीय संघांचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी ट्विट करून त्याला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. रवि शास्त्री यांच्या याच ट्विटला भारतीय फलंदाज मनोज तिवारी याने खोचक उत्तर दिलं आहे.
मनोजने वेस्ट इंडिज विरुद्ध ठोकले होते शतक
वेस्ट इंडिज संघाने 2011 मध्ये भारत दौरा केला होता. या दौऱ्यातील 5 व्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाज मनोज तिवारी याने 104 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. मात्र, उत्कृष्ट कामगिरी करूनही मनोज तिवारीला बरेच दिवस भारतीय संघात स्थान दिले गेले नव्हते.
शास्त्रींनी दिला सबुरीचा सल्ला
बुधवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरुद्ध केलेल्या जबरदस्त खेळीनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुर्यकुमारला सबुरीचा सल्ला दिला. “सुर्या तू संयम बाळगं व तुझं मनोबल कायम ठेव,” असा शास्त्रींनी ट्विट केला होता.
Surya namaskar 🙏🏻. Stay strong and patient @surya_14kumar #MIvsRCB pic.twitter.com/oJEJhekwpC
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 28, 2020
रवि शास्त्री यांच्या ट्विटला मनोजने दिले उत्तर
याच ट्विटवर मनोज तिवारीने खोचकटिपण्णी केली आहे. मनोज म्हणाला की, “माझी अपेक्षा होती की तुम्ही तेव्हा प्रशिक्षक पाहिजे होता जेव्हा मी शतकी खेळी केली होती. सूर्यकुमारसाठी केलेला ट्विट माझ्यासाठी केला असता, तर माझंही करियर वाचलं असतं. तुमचा हा ट्विट पाहून सुर्यकुमार नक्कीच आनंदी होईल. ” मनोज तिवारीने यातून कुणावर निशाणा साधला आहे हे मात्र सध्या कळायला मार्ग नाही.
I just wish u were the coach of Indian team during the series where i scored 💯 .. Your message like this would have surely helped my international career. Seeing this tweet of urs #Surya will be happy 👍 https://t.co/9vvVSkiBtT
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) October 28, 2020
मनोज तिवारी याची कारकीर्द
मनोजने 12 वनडे सामन्यात 23.92 च्या सरासरीने 287 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 आहे. आयपीएलमध्ये त्याने 98 सामने खेळले असून 1695 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 75 आहे.