गोवा- एटीके मोहन बागानने सातत्यपूर्ण कामगिरी करताना इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) सलग तीन विजय मिळवून टेबल टॉपर हैदराबादला आव्हान दिले आहे. शनिवारी त्यांना उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी केरला ब्लास्टर्स संघाशी भिडावे लागणार आहे.
केरला ब्लास्टर्सने मागील सामन्यात एससी ईस्ट बंगालचा पराभव करून विजयपथावर पुन्हा झेप घेतली. ते १५ सामन्यांत २६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत, तेच मोहन बागान १५ सामन्यांत २९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबादच्या खात्यातही २९ गुण आहेत, परंतु गोल फरकाने ते अव्वल ठरले आहेत. जुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. विशेष करून परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. लिस्टन कोलासो व मनवीर सिंग यांचा खेळ दिवसेंदिवस बहारदार होताना दिसतोय.
कोलासोने ७, तर मनवीरने ५ गोल केले आहेत. यंदाच्या पर्वात मोहन बागानसाठी सलग तीन सामन्यांत गोल करणारा मनवीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. आतापर्यंत मोहन बागानकडून याआधी रॉय कृष्णा व डेव्हिड विलियम्सन या परदेशी खेळाडूंनी ही कामगिरी केली होती. कोलासोने आयएसएल २१-२२ मध्ये सर्वाधिक ५७ शॉट्स घेतले आहेत, तर मनवीरने ३५ वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले आहेत. आकडेवारी पलिकडे कोलासोची कामगिरी ही लक्षवेधी ठरली आहे. मधल्याफळीत त्याचे वर्चस्व पाहायला मिळत आहेच, शिवाय डेव्हिड विलियम्स आणि मनवीर यांच्यासाठीही तो गोल करण्याच्या संधी निर्माण करतोय.
”खेळाडूंना तयार करणे आणि संघ सज्ज ठेवणे ही कोचिंग स्टाफची जबाबदारी आहे. काहीवेळेस कामगिरी चांगली न झाल्याने मी निराश झालो, परंतु असे प्रत्येक संघासोबत घडते. अल्पवाधीत हे खेळाडू मैदानावर उतरून चांगली कामगिरी करत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडू संघाला कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे,”असे फेरांडो यांनी सांगितले. कार्ल मॅकह्युज, ह्युगो बौमौस, रॉय कृष्णा आणि डेव्हिड विलियम्स हे दुखापतीतून सावरत आहेत, असेही फेरांडो यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,” केरला ब्लास्टर्सविरुद्ध आम्ही वेगळ्या रणनीतीने मैदानावर उतरणार आहोत. आम्हाला ही लीग जिंकायची आहे आणि त्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे गरजेचा आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. केरला हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळे उद्याचा सामना हा अंतिम सामन्यासारखाच असेल.” मोहन बागानने
केलेल्या ३१ गोल्सपैकी १७ गोल्स भारतीय खेळाडूंनी केले आहेत.
दरम्यान, केरला ब्लास्टर्सची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. पण, त्यांचा बचाव हा हंगामात सर्वोत्तम ठरला आहे. त्यांनी सहा सामन्यांत प्रतिस्पर्धीला गोल करू दिलेला नाही आणि या हंगमातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी २०१४ मध्ये सात सामन्यांत क्लिन शीट ठेवली होती आणि तेव्हा त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. गोलरक्षक प्रभसुखन गिल हा गोल्डन ग्लोव्ह्जच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने १२ सामन्यांत केवळ १० गोल होऊ दिले आहेत. ”अव्वल चौघांत राहण्यासाठी आम्ही संघर्षपूर्ण कामगिरी करू. संघ निवडीसाठी आमचे सर्व खेळाडू उपलब्ध आहेत आणि सराव सत्राचा अभ्यास करून अंतिम ११ खेळाडू मैदानावर उतरवू,”असे प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोव्हिच यांनी सांगितले.
सेंटर बॅक मार्को लेस्कोव्हिच हा संघात परतला आहे. एड्रीय लुना, अल्वारो व्हॅझक्यूज व जॉर्ज पेरेरा डाएझ यांची कामगिरी दमदार सुरू आहे. पण, मार्को आणि एनेस सिपोव्हिच यांच्यापैकी एकाची निवड करण्याचे आव्हान प्रशिक्षकांसमोर आहे. मागच्या वेळेस एटीके मोहन बागानने ४-२ अशा फरकाने केरला ब्लास्टर्सला पराभूत केले होते.