वय हा केवळ एक आकडा आहे असं म्हणतात. इंग्लंडमधील एका क्रिकेट सामन्यात दोन खेळाडूंनी हे वाक्य खरं करून दाखवलं. दोन वेगवेगळया वयोगटातील खेळाडूंनी हा चमत्कार करून दाखवला. मात्र हे दोन खेळाडू केवळ वेगवेगळया वयोगटातीलच नव्हते तर त्यांच्यात एक खास नातं देखील होतं. हे दोन खेळाडू म्हणजे चक्क आई आणि मुलाची जोडी होती.
होय, चक्क ३९ वर्षीय महिलेने आपल्या १२ वर्षीय मुलासह क्रिकेटच्या मैदानावर पराक्रम केला. विशेष म्हणजे हा पराक्रम इंग्लंडमध्ये पुरुषांच्या क्रिकेट क्लब मध्ये खेळतांना त्यांनी केला. ३९ वर्षीय महिलेने आपल्या मुलासह सलामीला फलंदाजी करतांना शतकी भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटूने हा विक्रम केला असून एरेन ब्रिंडेल असं तिचे नाव आहे. तिने आपला १२ वर्षीय मुलगा हॅरीसह हा कारनामा केला. इंग्लंडच्या ओबी सीसी ट्रोजंस या क्लबसाठी हे दोघे खेळत होते. नेटलहॅम संघाविरुद्ध खेळतांना त्यांनी ही कामगिरी केली. या सामन्यात सलामीला उतरून या दोघांनी नाबाद १४३ धावांची भागीदारी केली. यात एरेनने वैयक्तिक अर्धशतक देखील झळकवले. त्यांच्या या भागीदारीमुळे त्यांच्या संघाला विजय मिळवता आला.
एरेनने यापूर्वी आपल्या कारकिर्दीत इंग्लंडकडून १३४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात तिने २८५२ धावा काढल्या आहेत. याशिवाय तीन वेळेला अॅशेस मालिका जिंकण्याचा पराक्रम देखील तिने केला आहे. मात्र आता मुलासोबत शतकी भागीदारी रचत एक मानाचा तुरा तिच्या शिरपेचात खोवला गेला आहे.
एरेन ब्रिंडेलची कारकीर्द
एरेन ब्रिंडेल १९व्या वर्षीच इंग्लंड संघाची कर्णधार झाली होती. महिला क्रिकेट मधील हा एक रेकॉर्ड आहे. २००५ सालच्या अॅशेस मध्ये शानदार प्रदर्शन करत तिने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र आई झाल्यावर २००५ ते २०११ या काळात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. मात्र या दरम्यान तिने क्लब क्रिकेट खेळणे सुरू ठेवले होते. पुरुषांच्या प्रीमियर लीगमध्ये शतक ठोकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यावर तिने नंतर २०१४ साली निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहचे चाहते थेट आयर्लंडमध्ये देखील! ‘ही’ महिला क्रिकेटपटू मानते आदर्श
भारताचा ‘हा’ वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज; आयपीएल संघाने केले ट्विट