भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरने माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, की जर धोनी कर्णधार नसता आणि तिसऱ्या क्रमांकावर सलग फलंदाजी करत असता, तर तो नक्कीच जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनला असता.
“कदाचित जागतिक क्रिकेटने एक गोष्ट गमावली आहे. ती म्हणजे, धोनी (MS Dhoni) भारताचे नेतृत्व केले परंतु तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली नाही. जर तो तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करत असता, तर कदाचित जागतिक क्रिकेटने पूर्णपणे वेगळा खेळाडू पाहिला असता,” असे स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला.
“त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत, अनेक विक्रम मोडले आहेत. विक्रम विसरून जा, ते मोडण्यासाठी बनतात. त्याने भारताचे कर्णधारपद स्विकारले नसते आणि तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर तो जगातील सर्वात रोमांचक क्रिकेटपटू ठरला असता,” असेही पुढे बोलताना गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला.
धोनीने आपल्या वनडे कारकीर्दीची सुरुवात २००४ मध्ये केली होती. त्याच्या कारकीर्दीतील २ सर्वोत्तम खेळी त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केल्या होत्या. २००५ मध्ये जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा विशाखापट्टणम वनडे सामन्यात धोनीने तूफानी शतकी खेळी केली होती.
तेव्हापासून त्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख मिळवली होती. त्यानंतर २००५ मध्येच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने आक्रमक फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. त्याने वरच्या फळीत खेळताना केवळ १९ वनडे सामने खेळले. त्यात त्याने ७७.९२ च्या सरासरीने आणि जवळपास १०० च्या स्ट्राईक रेटने १०९१ धावा केल्या. तसेच, त्याने वनडेत एकूण १०७७३ धावा केल्या आहेत. परंतु त्यातील सर्वाधिक धावा या त्याने ५व्या आणि ६व्या क्रमांकावर खेळताना केल्या आहेत. त्याने कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाला २००७मध्ये टी२० विश्वचषक आणि २०११मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला होता.
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ४८७६, वनडेत १०७७३ आणि टी२०त १६१७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडचे नेतृत्व करण्यास बेन स्टोक्स सज्ज
सचिन तेंडुलकरने दिला आयसीसीला सल्ला, जर चेंडूला लाळ लावता येणार नसेल तर…
आफ्रिदीला कोरोनाची लागण होताच गौतम गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया