आयपीएल 2021 मधील सतरावा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाब किंग या संघात खेळविण्यात आला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाला पुन्हा एकदा मधल्या फळीने निराश केले. त्यामुळे निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून मुंबईला 131 धावा करता आल्या.
त्यानंतर पंजाब संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षण करत असलेल्या मुंबई संघाचा कर्णधार रोहितने जयंत यादवला गोलंदाजीबाबत धडे दिले. यावेळचा त्याचा आवाज यष्टीच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
ही गोष्ट पंजाब संघातील क्रिस गेलसमोर जयंत गोलंदाजी करीता आला त्यावेळची आहे. जेव्हा जयंत गोलंदाजी करिता आला तेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने जयंतला चेंडू कोरडा आहे. त्यामुळे चेंडू उंच उडाला, तर फलंदाजाला खेळण्यास अवघड जाईल असे सांगतानाचा आवाज यष्टिच्या माइकमध्ये कैद झाला आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1385646766104596480?s=20
या सामन्याबाबत बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना उतरलेल्या मुंबई संघातील रोहित शर्माने 66 धावा केल्या; तर सूर्यकुमार यादवने 33 धावा केल्या. परंतु पुन्हा एकदा या संघातील मधल्या फळीने निराश केल्याने मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 षटकात 131 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून गोलंदाजी करत असलेले मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाचा कर्णधार राहुलच्या 60 धावा आणि ख्रिस गेलच्या 43 धावांच्या जोरावर या डावातील 17 व्या षटकात पंजाबने मुंबईवर 9 गडी राखून विजय मिळवला.