इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना रविवारीपासून (१९ सप्टेंबर) प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिलीच लढत ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि ३ वेळस आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये पार पडणार आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रोमांचक लढत पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यासाठी आपल्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरणार आहेत.
मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लढत भारत-पाकिस्तान सामन्यापेक्षा काही कमी नसते. एकाहून एक जबरदस्त खेळाडूंची भरमार असलेले हे दोन्हीही संघ विजय मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करत असतात. हे दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ३१ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघ चेन्नई सुपर किंग्स संघावर भारी पडला आहे. मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला १९ वेळेस पराभूत केले आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघाला १२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
उभय संघातील गेल्या ७ सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्स संघाने ६ वेळेस चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभूत केले आहेत. तसेच आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पहिल्या टप्प्यात देखील हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ४ गडी राखून पराभूत केले होते.
दोन्ही संघांची अशी असू शकते संभावित प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, नाथन कूल्टर नाइल/जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी आणि दीपक चाहर.
महत्त्वाच्या बातम्या-
एकही सामना न खेळवता ‘या’ गोलंदाजांला मुंबई इंडियन्सकडून नारळ, २७१ विकेट्स घेणाऱ्या शिलेदारास संधी
दमदार सुरुवात, म्हणजे सामनाही खिशात! चेन्नई वि. मुंबई सामन्यात ‘अशी’ असेल उभय संघांची सलामी जोडी