गुरुवारी (दि. 31 ऑगस्ट) आशिया चषक 2023 स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. हा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे पार पडत आहे. या सामन्यात बांगलादेशचा स्टार फलंदाज नजमुल होसेन शांतो याने झंझावाती फलंदाजी केली, पण तो शतक ठोकण्यास मुकला. त्याने वादळी फलंदाजीने बांगलादेश संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवण्यात मदत केली, हे मात्र खरे.
नजमुल होसेन शांतोचे शतक हुकले
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) संघातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. बांगलादेशचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले. 11व्या षटकातच बांगलादेशने 36 धावांवर आपल्या महत्त्वाच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये मोहम्मद नईम (16), तंजिद हसन (0) आणि कर्णधार शाकिब अल हसन (5) यांचा समावेश होता. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या नजमुल होसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याने शानदार टिच्चून फलंदाजी केली आणि संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले.
नजमुलने यावेळी 122 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या. यामध्ये 7 चौकारांचा समावेश होता. नजमुल शतक झळकावण्यास यशस्वी झाला असता, तर हे त्याचे वनडे कारकीर्दीतील दुसरेच शतक ठरले असते. नजमुल 41.3 षटकात महीश थीक्षणा याच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद झाला, तेव्हा बांगलादेश संघाने 8 विकेट्स गमावत 162 धावा केल्या होत्या. मात्र, नंतर बांगलादेशचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. बांगलादेशने 42.4 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 164 धावा केल्या. तसेच, सहयजमान श्रीलंकेला 165 धावांचे आव्हान दिले.
नजमुलची वनडे कारकीर्द
नजमुल याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 20 सप्टेंबर, 2018 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या खेळण्यापूर्वी 28 वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने 27.96च्या सरासरीने 727 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 1 शतकाचाही समावेश आहे. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही 117 इतकी राहिली आहे.
बांगलादेश ब गटात
बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) सुरू झालेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत एकूण 6 संघ भाग घेत आहेत. यामध्ये यजमान पाकिस्तान, सहयजमान श्रीलंका यांच्यासह बांगलादेश, भारत, अफगाणिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. हे सहा संघ अ आणि ब अशा दोन गटात विभागले गेले आहेत. अ गटात, भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. तसेच, ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ आहेत. (Najmul Hossain Shanto miss to score century against sri lanka asia cup 2023)
हेही वाचाच-
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक
भारताचा माजी खेळाडू बाबरच्या शतकावर फिदा; म्हणाला, ‘त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी…’