नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला पारस खडकाने मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याने ट्विटरवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. पारस हा नेपाळचा अष्टपैलू खेळाडू होता. त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकूण १० एकदिवसीय आणि ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
निवृत्तीनंतर पारस खडका म्हणाला
“नेपाळसाठी क्रिकेट खेळणे हेच माझे सर्वात मोठे यश आहे. यासाठी मी माझे कोच, सहकारी, प्रशंसक आणि मित्रांचा नेहमीच त्यांनी दिलेल्या समर्थनाचा ऋणी राहील. २००२ मध्ये मी जेव्हा १५ वर्षांचा होतो. तेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून केलेला प्रवास आज संपला”
विशेष म्हणजे ३ ऑगस्ट २०१८ रोजी नेपाळने त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना जिंकला होता. याच दिवशी पारसने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. पारसने आत्तापर्यंत नेपाळने खेळलेल्या सर्व एकदिवसीय सामन्यात सहभाग घेतला आहे.
अशी होती पारस खडकाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द –
अवघ्या १६ व्या वर्षी २००४ साली पारसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २०१४ ला आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये आणि २०१८ ला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
पारसने खेळलेल्या १० एकदिवसीय सामन्यात एकूण ३१५ धावा केल्या आहेत. ज्यात १ शतक आणि १ अर्धशतक आहे. तसेच ३३ टी-२० सामन्यांमध्ये ७९९ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना त्याने १० एकदिवसीय सामन्यात ९ विकेट्स तर ३३ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.
तीन वेळा १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व –
साल २००४, २००६ आणि २००८ असे ३ वेळा १९ वर्षाखालील विश्वचषकात पारसने नेपाळचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्वाच्या बातम्या –