झिम्बाब्वेचा माजी सलामीवीर नील जॉन्सन हे नाव माहीत नसलेला ९० च्या दशकातील एकही क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. ज्यावेळी, झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ आपल्या यशाच्या शिखरावर होता तेव्हा, त्या संघाला तिथे नेण्याचे काम ऍलिस्टर कॅम्पबेल, फ्लॉवर बंधू, हीथ स्ट्रीक, हेन्री ओलोंगा यांच्यासोबत नील जॉन्सन याने देखील केले होते. झिंबाब्वेच्या सर्वच खेळाडूंची फॅन फॉलोइंग त्यावेळी खूप जास्त होती.
२४ जानेवारी १९७० मध्ये र्होडेशिया येथे जन्मलेल्या नीलने ऑक्टोबर १९९८ मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात तो फलंदाजीमध्ये साफ फ्लॉप गेला. दोन्ही डावात ४ व १ अशा धावा त्याने केल्या. गोलंदाजीत मात्र, पहिल्या डावात एक व दुसऱ्या डावात तीन गडी जॉन्सनने बाद केले. जॉन्सनने भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याला दोन्ही डावात आपले शिकार बनवले होते. झिंबाब्वेने ती एकमेव कसोटी जिंकली होती.
झिम्बाब्वेसाठी जॉन्सन पदार्पणापासूनच चमकदार कामगिरी करत होता. पण, त्याला खरी ओळख मिळाली ती १९९९ क्रिकेट विश्वचषकात. नील जॉन्सनने विश्वचषकामध्ये झिम्बाब्वेसाठी सलामीवीराची भूमिका पार पाडताना, आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना आपल्या योजना बदलण्यास भाग पाडले. झिम्बाब्वेकडे ब्रॅंडेस, हीथ स्ट्रीक आणि हेन्री ओलोंगासारखे एकाहुन एक सरस गोलंदाज असताना, जॉन्सनने गोलंदाजीतही छाप पाडली.
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात जॉन्सनने केनियाविरुद्ध ४ बळी मिळवत सामनावीराचा किताब आपल्या नावे केला. पुढच्या सामन्यात, भारताचा पराभव करून झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास दुणावला. मात्र, इंग्लंड व श्रीलंकेने त्यांचा पराभव केला.
झिम्बाब्वेचा अखेरचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. तो सामना जिंकून झिम्बाब्वे सुपर सिक्स मध्ये दाखल होऊ शकत होती. झिम्बाब्वेसाठी करा अथवा मरा अशी परिस्थिती निर्माण झालेली.
जॉन्सनने या सामन्यात केनिया विरुद्धची आपली कामगिरी पुन्हा दाखवली. त्याने ११७ चेंडूत ७६ धावांची झुंजार खेळी केली. मरे गुडविन व अँडी फ्लॉवर यांच्या योगदानाने झिम्बाब्वेने २३३ धावा फलकावर लावल्या. आफ्रिकेच्या संघासाठी हे तितके मोठे आव्हान नव्हते.
जॉन्सनने आफ्रिकेच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर गॅरी कर्स्टनला माघारी धाडले. हीथ स्ट्रीकसोबत मिळवून पहिल्या ५ षटकात २५ धावात आफ्रिकेचे ३ गडी बाद केले होते. त्यावेळी दिग्गज होण्याच्या वाटेवर असलेल्या अष्टपैलू जॅक कॅलिस व कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांना झटपट बाद करत जॉन्सनने दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानातील हवा काढून घेतली. झिम्बाब्वेने द. आफ्रिकेला ४८ धावांनी पराभूत करत सुपर सिक्समध्ये प्रवेश केला. सामनावीर अर्थातच नील जॉन्सन ठरला होता.
सुपर सिक्समधील सामन्यात, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी झिम्बाब्वेसमोर ३०४ धावांचे लक्ष ठेवले असताना, दुसऱ्या बाजूने एकेक फलंदाज बाद होत गेले. मात्र, जॉन्सन सलामीला येऊन पूर्ण ५० षटके खेळत नाबाद राहिला. त्याने १४४ चेंडूत १३२ धावा बनविल्या. पराभूत होऊनही जॉन्सन त्यादेखील सामन्याचा सामनावीर ठरला. एकाच विश्वचषकात तिसऱ्यांदा त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. पुढील सामन्यात, पाकिस्तानकडून पराभूत झाल्याने झिम्बाब्वेला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
जॉन्सनने १९९९ विश्वचषकाच्या ८ सामन्यात ५२.४२ च्या अफलातून सरासरीने ३६७ धावा काढल्या होत्या. याच बरोबर १२ बळी देखील आपल्या नावे केले होते.
Happy birthday to former Zimbabwe all-rounder Neil Johnson!
He was on top form at the 1999 @cricketworldcup with a century against Australia at Lord's and an all-round display helping his side to their first-ever victory against South Africa in ODIs! pic.twitter.com/WxBXIUVKcQ
— ICC (@ICC) January 24, 2019
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाशी वाद झाल्याने जॉन्सन २००० साली अवघे दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून निवृत्त झाला. निवृत्त होण्यापूर्वी त्याने ४८ वनडे व १३ कसोटीत भाग घेतला होता. कसोटीत २४ च्या सरासरीने ५३२ तर वनडेमध्ये ३६.५० इतक्या सरासरीद्वारे १,६८९ धावा काढल्या. वनडे क्रिकेटमध्ये ४ शतके व ११ अर्धशतके त्याच्या नावे होती. गोलंदाजीतदेखील त्याने आपले योगदान दिले. कसोटीत १५ तर वनडेमध्ये ३५ गडी त्याने तंबूत पाठवले होते.
लान्स क्लुसनर, वसीम अक्रम आणि शॉन पोलॉक यासारखे अनेक समकालीन अष्टपैलू खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असल्याने जॉन्सनला अष्टपैलू म्हणून तितकीशी ओळख मिळाली नाही. तो एक गुणवान खेळाडू होता. इतक्या कमी कालावधीत, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केले होते.
त्या विश्वचषकातील लान्स क्लुसनरच्या कामगिरीमुळे जॉन्सनची कामगिरी काहीशी झाकोळली गेली. मात्र, जॉन्सन चाहत्यांच्या कायम मनात राहिला. झिम्बाब्वे क्रिकेटने, टाळता येणाऱ्या अनेक गोष्टींमुळे जे काही हिरे गमावले, त्यामध्ये नील जॉन्सनचा देखील समावेश झाला.
ट्रेंडिंग लेख –
लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज
आयपीएल २०२०: युएईमध्ये शतक झळकावू शकतात हे मुंबई इंडियन्सचे ३ धडाकेबाज फलंदाज…
वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला धोनी म्हणतो, काय रे म्हाताऱ्या