कोरोना महामारीपासून बंद असलेले भारतीय क्रिकेट नवीन वर्षात सुरू होणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला सुरुवात होईल. सर्वच राज्य क्रिकेट संघटना या स्पर्धेसाठी तयार आहेत. बऱ्याच राज्यांनी या स्पर्धेसाठी आपापल्या संघांची घोषणा देखील केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील शनिवारी (२६ डिसेंबर) आपला संघ जाहीर केला. मुख्य म्हणजे, सर्वांना अपेक्षा असताना भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनला या संघात स्थान मिळाले नाही.
सूर्यकुमारकडे मुंबईचे नेतृत्त्व
भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला १० जानेवारी २०२१ पासून सुरुवात होईल. दरवर्षी रणजी ट्रॉफीने सुरू होणारा हंगाम यावेळी टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. देशांतर्गत क्रिकेटचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपल्या २० सदस्यीय संघाची घोषणा केली. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने आयपीएल २०२० गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची, तर अनुभवी यष्टीरक्षक आदित्य तरेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अर्जुनला नाही मुंबई संघात जागा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठीचा संघ निवडण्यापूर्वी मुंबई क्रिकेट संघाने आंतरसंघीय स्पर्धा खेळली होती. या स्पर्धेत अर्जुनचा समावेश मुंबई ड संघात केला गेला होता. मात्र, संपूर्ण स्पर्धेत अर्जुनला अजिबात आपली छाप सोडता आली नाही. स्पर्धेत चार सामने खेळताना तो चारच बळी घेऊ शकला. मुंबई ब संघाविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या एका षटकात २१ धावा लुटलेल्या. फलंदाजीत तर अर्जुन पूर्णतः अपयशी ठरला आहे. त्याला चार सामन्यात अवघ्या ७ धावा बनवता आल्या. या अतिशय खराब कामगिरीमुळेच कदाचित वरिष्ठ संघात त्याची जागा बनली नाही.
मुंबईच्या संघात मोठ्या खेळाडूंचा समावेश
मुंबईच्या संघात या स्पर्धेसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक बड्या खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. सूर्यकुमार यादव व आदित्य तरेसह यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, सर्फराज खान व धवल कुलकर्णी या अनुभवी खेळाडूंची निवड केली गेली आहे. अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने संघाचा भाग नाहीत, तर श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ साठी मुंबईचा संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शुभम रांजणे, शिवम दुबे, सुजित नाईक, तुषार देशपांडे, साईराज पाटील, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलांची, शशांक आतर्डे, हार्दिक तामोरे, आकाश पारकर व सुफीयान शेख
महत्त्वाच्या बातम्या-
घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केला भारतीय फलंदाजी रणनितीचा खुलासा, म्हणाला…
‘तो खूप मेहनतीने इथे पोहोचला आहे’, भारताच्या प्रमुख गोलंदाजाने केली सिराजची प्रशंसा
मुश्ताक अली स्पर्धेतून ‘कॅप्टन कूल’ करणार पुनरागमन? धोनीने स्वतःच दिले स्पष्टीकरण