प्रो कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काही नियमही कारणीभूत आहेत. जसे की रेड फक्त ३० सेकंदांचीच असणार, सुपर रेड, सुपर टॅकल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘डू ऑर डाय रेड’,करा किंवा मरा रेड. जर दोन सलग रेडमध्ये गुण मिळवले नाही तर तिसरी ‘डू ऑर डाय रेड’ असते. डू ऑर डाय रेड म्हणजे या रेडमध्ये तुम्हाला गुण मिळवूनच परत यायचे असते. जर तुम्ही हे करण्यात अपयशी ठरला तर तुम्ही स्वतः बाद होऊन गुण विरोधी संघाला मिळतात.
प्रत्येक संघ त्यांचा महत्त्वाचा खेळाडू बाद होऊ नये आणि त्यांना त्याचा चांगला उपयोग व्हावा म्हणून आपल्या संघात डू ऑर डाय रेडमध्ये निपुण असलेले खेळाडू खेळवतात. कोणी सक्तीने एखाद्या खेळाडूला डू ऑर डाय रेडसाठी पाठवतात तर कोणी खास खेळाडू त्यासाठी घडवत असतात. तर आपण आता पाहू काही डू ऑर डाय स्पेशालिस्ट खेळाडू जे संघासाठी या मोसमात महत्वाचे ठरू शकतात.
#१रिशांक देवाडिगा-
मागील चार मोसमात यु मुंबाचा खेळाडू असणारा रिशांक यंदा यु पी योद्धाज संघात आहे. रिशांक तिथेही करा किंवा मारा रेडमध्ये आपली निपुणता दाखवेल आणि त्याच कामसाठी त्याला संघात घेतले असणार आहे. त्याने ५९ सामन्यात ३२० गुण मिळवले असून ५६७ रेड करताना २८४ गुण मिळवले आहेत तर त्यात त्याने २२५ यशस्वी तर १७० अयशस्वी रेड केल्या आहेत. तिसऱ्या मोसमात तर रिशांक याने १०० पेक्षा जास्त गुण घेत आपली कामगीरी चोख बजावत यु मुंबा संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते.
#२ राजेश मंडल-
मागील मोसमापर्यंत पाटणा पायरेट्सचा डू ऑर डाय स्पेशालिस्ट खेळाडू असणारा राजेश यंदाच्या मोसमात पुणेरी पलटणमध्ये असून पुणे संघासाठी आपली उपयुक्तता सिद्ध करणार आहे. राजेश डू ऑर डाय रेड’ मधील खूप माहीर खेळाडू आहे. पाटणा संघाला सलग दोन विजेतेपदे मिळवून देण्यात राजेशचा खूप मोठा वाटा आहे. राजेशने प्रो कबड्डीमध्ये खेळताना ५४ सामन्यात १६५ गुण मिळवले असून ४४० रेड करताना रिडींगमध्ये १५६ गुण मिळवले तर ९ डिफेन्समध्ये गुण मिळवले असून ४४० रेड मधील १२४ यशस्वी रेड आहेत तर १११ अयशस्वी रेड आहेत.
#३सुकेश हेगडे-
तेलगू टायटन्सचा हा माजी खेळाडू यंदा गुजरात संघाचा कर्णधार आहे. राहुल चौधरी सोबत केलेल्या उत्तम भागीदारीमुळे सुकेश चर्चेत आला. पहिल्या तीन मोसमात सुकेशने डू ऑर डाय रेडरची कामगिरी बजावली होती तर चौथ्या मोसमात दुसऱ्या मुख्य रेडरची कामगिरी त्याने बजावली. प्रो कबड्डीमध्ये खेळताना सुकेशने ४९ सामन्यात २१८ गुण मिळवले असून ४४७ रेड करताना २०९ रिडींग गुण तर ९ गुण डिफेन्समध्ये मिळवले आहेत. त्यात सुकेशने १५८ यशस्वी रेड तर ८३ अयशस्वी रेड केल्या आहेत.
#४निलेश साळुंके-
महाराष्ट्रातील या खेळाडूने प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात डू ऑर डाय रेड स्पेशालिस्ट म्हणून खूप चांगली कामगिरी करताना सर्वांचे लक्ष्य आपल्याकडे ओढून घेतले. त्याने प्रो कबड्डीमध्ये खेळताना २२ सामन्यात ७२ गुण मिळवले असून त्यात त्याने ७१ गुण रेडींगमध्ये मिळवले आहेत तर १गुण डिफेन्समध्ये मिळवला आहे. १५९ रेड करताना ५२ यशस्वी रेड केल्या आहेत तर ३९ अयशस्वी रेड केल्या आहेत.
#५ अजय कुमार-
मागील मोसमात जयपूर कडून खेळणारा अजय यंदाच्या मोसमात बेंगळुरू बुल्स संघासाठी खेळणार असून रोहित कुमारसोबत जोडी बनवण्याचा प्रयत्न करेन. मागील मोसमात अजयने डू ऑर डाय रेडमध्ये सर्वात यशस्वी कामगिरी करत कबड्डी विश्वाला त्याच्या नावाची दाखल घ्यायला लावली त्याचा फायदा म्हणून रणधीर सिंग सासारख्या मोठ्या प्रशिक्षकाने त्याच्यावर विश्वास टाकत त्याला संघात घेतले. प्रो कब्बडीमध्ये खेळताना अजयने १५ सामन्यात ६१ गुण मिळवले आहेत त्यात सर्व त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत.१०७ रेड करताना ४४ यशस्वी रेड तर तर २३ अयशस्वी रेड त्याने केल्या आहेत.