भारत आणि इंग्लंड यांचा दरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने हा सामना जिंकत आघाडी घेतली आहे. उर्वरित, तीन सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू या मालिकेतून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
हा खेळाडू झाला मालिकेतून बाहेर
मागील अनेक वर्षांपासून भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला अंगठ्याची दुखापत झाली होती. त्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. आता येत असलेल्या बातम्यांनुसार, जडेजा मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी ही उपलब्ध नसेल. सोबतच, इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.
एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाच्या माहितीनुसार, जडेजाला दुखापतीतून सावरण्यास वेळ लागत आहे. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो सहभागी होणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच, वनडे व टी२० मालिकांमध्ये तो सहभागी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
भारतीय संघाला जाणवतेय जडेजाची उणीव
रवींद्र जडेजा संघात नसल्याची उणीव भारतीय संघाला सातत्याने जाणवत आहे. चेन्नई येथील पहिल्या कसोटीत अनुभवी रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीची जादू दाखवली. मात्र, दुसरे अनुभवहीन फिरकीपटू शाहबाज नदीम व वाशिंग्टन सुंदर हे आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी दिलेला नदीम दोन्ही डावात मिळून चार बळी मिळविण्यात यशस्वी ठरला. परंतु, त्यासाठी त्याने भरपूर धावा दिल्या.
भारताचा अव्वल अष्टपैलू आहे जडेजा
बत्तीसवर्षीय जडेजाने भातासाठी आत्तापर्यंत ५१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २४.३२ च्या सरासरीने त्याने २२० बळी मिळवले आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत जडेजाने ९ वेळा एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच फलंदाजीत ही कमाल दाखवताना १,९५४ धावा काढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल
विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण