दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa vs India) झालेल्या ३ सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका झाल्यानंतर विराट कोहली याने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य वाटले होते.
तसेच त्याने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. गेल्या ४ ते ५ महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने आपले मत मांडले आहे.
विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, “मी आश्चर्यचकित झालो होतो. कारण आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आमचे याबाबत बोलणे झाले होते. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचे सांगितले होते. तसेच कसोटी क्रिकेटचे नेतृत्त्व सुरू ठेवण्यासाठी तो उत्साही होता. तो त्याच उत्साहात कसोटी संघाचे नेतृत्व करायचा. त्याला हे खूप आवडायचे. परंतु, मला जेव्हा कळाले की, त्याने हा निर्णय घेतला आहे, त्यावेळी मला भरपूर आश्चर्य वाटले होते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षकाला मर्यादित वेळ असतो. विराट जवळपास ७ वर्षे कर्णधार होता. भारतासारख्या देशात जिथे क्रिकेटवर खूप प्रेम केलं जातं. तिथे इतके दिवस कर्णधार राहणे ही मोठी गोष्ट आहे.”
“आता विराट कोहली पूर्णपणे नेतृत्वाच्या जबाबदारीपासून मुक्त झाला आहे. त्यामुळे तो आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. काही विक्रम देखील मोडू शकतो. विराट येण्यापूर्वी भारतीय संघावर नजर टाकली तर लक्षात येईल की, त्या संघाने मायदेशात अनेक सामने जिंकले होते, परंतु परदेशातील कामगिरी निराशाजनक होती. मात्र विराट कोहलीने संघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारताने मायदेशात आणि परदेशात जाऊनही बरेच सामने जिंकले,” असे रिकी पाँटिंग म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्यक्तव्यांनी निवडकर्त्यांनाच ठरवले खोटे? वाचा सविस्तर
हेलिकॉप्टर शॉट मारण्यात अफगाणिस्तानचा ‘या’ फलंदाजाची धोनीलाही टक्कर, पाहा व्हिडिओ
U19 World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मिळाली ‘ही’ गुड न्यूज