मुंबई । भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने 2007 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण तरीही जवळजवळ सहा वर्षे संघात स्थान मिळविण्यास पक्के करण्यासाठी संघर्ष करत होता. 2013 साली महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला मध्यक्रमाऐवजी सलामीची जबाबदारी सोपवली. त्यानंतर रोहितने मागे वळून कधीच पाहिले नाही. महानतेचा एकेक पायऱ्या तो झपाझप चढू लागला. आज जगातील तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.
सलामीला खेळण्याची संधी मिळाल्यानंतर रोहितन आपलं प्रगतीपुस्तक तितकच प्रगतीशील ठेवलं. त्याच्यामध्ये असलेल्या गुणामुळे त्याने अनेकांना प्रभावित केले होते. त्याच्यातले गुण हेरुन 2009 साली ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने रोहित शर्मा विषयी भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी काय होती याचा खुलासा फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये बोलताना केला.
तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर गिलख्रिस्टने खूप वर्षांपूर्वी रोहित मध्ये असलेल्या नेतृत्वाची क्षमता ओळखली होती. अॅडम गिलख्रिस्ट 2009 साली डेक्कन चार्जर संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याने रोहित शर्माला उपकर्णधार बनवले. हळूहळू तो पुढे पाऊल टाकू लागला. त्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण अधिक विकसित होत गेले.”
तो म्हणाला, “रोहित शर्मा हा प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने काही ऐतिहासिक खेळी केल्या.
2007 चा टी ट्वेंटी विश्वचषक त्याचबरोबर, त्याचवर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने साऱ्यांनाच आपल्या कामगिरीने प्रभावित केले होते. यावेळी त्याच्याकडे अनुभव कमी होता, मात्र जसा विचार करायचा त्या विचाराने संघ व्यवस्थापन आणि गिलख्रिस्ट खूपच प्रभावित झाले होते आणि त्याचवेळी अॅडम गिलख्रिस्टने भविष्यवाणी केली होती की, रोहित शर्मा पुढे कर्णधार होऊ शकतो .”
प्रज्ञान ओझाने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि त्याचबरोबर डेक्कन चार्जर्स या संघाकडून खेळला आहे. विशेष म्हणजे डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स या विजयी संघाचा तो सदस्य होता. या दोन्ही संघाविषयी तो बोलताना म्हणाला, “या दोन्ही संघांची तुलना करणे फारच अवघड आहे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे त्याने नमूद केले.”
रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ चार वेळा आयपीएलची विजेती टीम ठरली आहे. प्रज्ञान ओझाने त्याच्या कारकीर्दीत 24 कसोटीत 113,18 एकदिवसीयमध्ये 21 आणि 6 टी ट्वेंटी सामन्यात 10 बळी घेतले आहेत.