भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर दुसरा टी२० सामना पार पडला. भारतीय संघाने ८ धावांनी हा सामना जिंकला आहे. यासह यजमानांनी २-० अशी विजयी आघाडी घेत ३ सामन्यांची टी२० मालिका खिशात घातली आहे. यापूर्वी वनडे मालिकेतही भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३-० ने क्लिन स्वीप केले होते. या विजयानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्मा कमालीचा निराश दिसला. त्याने स्वतःच्या संघातील खेळाडूंना क्षेत्ररक्षणाबाबत खडे बोल सुनावले.
काय म्हणाला रोहित?
भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घातली असली तरी, संघाचा कर्णधार रोहित शर्मा अत्यंत नाराज दिसला. त्याने सामना अखेरच्या चेंडूपर्यंत जाण्यासाठी संघाच्या क्षेत्ररक्षकांना जबाबदार धरले. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना तो म्हणाला,
“खरं सांगायचे झाले तर मी संघाच्या क्षेत्ररक्षणामूळे नाराज आहे. आम्ही मिळालेल्या संधीचा फायदा उचलू शकलो नाही. आम्ही ते सर्व झेल पकडले असते तर, सामना अखेरच्या षटकापर्यंत ताणला गेला नसता. वेस्ट इंडीजसारख्या संघाविरुद्ध अशा चुका टाळायच्या असतात. कारण, तो एक धोकादायक संघ आहे. ते अत्यंत निडरपणे खेळत असतात.”
भारतीय खेळाडूंनी सोडले अनेक झेल
धावफलकावर १८६ धावा लावल्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षकांनी अत्यंत गचाळ कामगिरी केली. युवा रवी बिश्नोई याने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या निकोलस पूरन याचा झेल सोडला व त्याने पुढे अर्धशतक झळकावले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व विराट कोहली यांनी देखील अष्टपैलू रॉवमन पॉवेल याला प्रत्येकी एक जीवदान दिले. तर, व्यंकटेश अय्यरला ब्रेंडन किंग याचा झेल घेण्यात अपयश आले होते. तसेच भारतीय खेळाडूंनी धावबादच्या दोन संधी सोडल्या. यष्टीरक्षक रिषभ पंतनेही काही नाहक चुका केल्या.
महत्वाच्या बातम्या-