भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने )शुक्रवारी (१७ सप्टेंबर) तामिळनाडू माजी रणजीपटू श्रीधरन शरत यांना जूनियर राष्ट्रीय निवड समीतीचे चेअरमनपद दिले आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा हे त्यांचे पहिले लक्ष्य असणार आहे. या कामात माजी भारतीय क्रिकेटपटू त्यांना मदत करणार आहे.
श्रीधरन शरत यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,”मी लवकरच बेंगलोरची यात्रा करण्याची आणि राहुल द्रविड यांची भेट घेण्याचा विचार करत आहे. ते गेल्या काही वर्षांपासून १९ वर्षाखालील संघासोबत आहेत. त्यामुळे त्यांना खेळाडूंच्या कौशल्याची चांगली जाण आहे. ते आमचे मार्गदर्शक असणार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत दीर्घ चर्चा करून एक रोडमॅप तयार करण्याचा विचार करत आहोत.”
गेल्या २ वर्ष वर्षांपासून कोरोना सुरू असल्यामुळे, देशात कोणत्याही वयोगटातील क्रिकेट खेळले गेले नाहीये. दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून राज्यांनी खेळाडूंना सराव सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड करणे कठीण जाणार आहे. श्रीधरन शरत यांच्या मते, या मोठ्या स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी निवड समितीकडे पर्याप्त वेळ नाही. तरीदेखील ते चांगला संघ निवडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
युवा खेळाडूंना घडवण्यावर देणार जोर
श्रीधरन शरत हे फक्त १९ वर्षाखालील संघ निवडण्याच्या प्रयत्नात नसणार आहे. ते युवा खेळाडूंना घडवण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत. श्रीधरन शरत यांनी म्हटले की,”१६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघ वगळता प्रत्येक वयोगटात ३०- ४० खेळाडूंचा पुल असावा. त्या खेळाडूंना अशाप्रकारे तयार केले गेले पाहिजे की, त्यांनी रणजी ट्रॉफी आणि इतर स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. हीच प्रक्रिया असायला हवी.”
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप
दहशतवादी हल्ल्यांमुळे क्रिकेटवर परिणाम झाल्याच्या ५ घटना; पाकिस्तान राहिलाय केंद्रबिंदू
टी२० विश्वचषक: पाकिस्तानशी भिडण्याआधी सराव सामन्यात ‘टीम इंडिया’ ‘या’ तगड्या संघांशी करणार दोन हात