भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने २४ वर्षांपूर्वी, १८ सप्टेंबर १९९७ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी एक मोठा पराक्रम केला होता, जो आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. सौरव गांगुलीने अनेक विक्रम केले आणि मोडले आहेत. प्रतिस्पर्ध्यांना आपल्या फलंदाजीने घामही फोडला आहे. परंतु, आजच्या दिवशी १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सौरव गांगुली केवळ २ धावा करून बाद झाला. यानंतर, गोलंदाजीतील कामगिरीच्या आधारे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता.
सौरव गांगुली त्याच्या फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जात होता. परंतु, १९९७ मध्ये टोरंटो येथे खेळलेला भारत-पाकिस्तान संघातील एकदिवसीय सामना सौरव गांगुलीच्या गोलंदाजीसाठी लक्षात ठेवला जातो. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजीला उतरला आणि सलामीवीर म्हणून फलंदाजीस आलेल्या सौरव गांगुली फक्त २ धावा करून बाद झाला. ५० षटकांच्या सामन्यात भारत १८६ धावांवर सर्वबाद झाला होता.
फलंदाजीत अपयशी ठरलेल्या सौरव गांगुलीने गोलंदाजीमध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला. वास्तविक पाकिस्तान लक्ष्याच्या दिशेने योग्य वाटचाल करत होता आणि त्यांनी तीन गडी गमावून १०३ धावा केल्या होत्या. मग येथून सौरव गांगुलीने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवायला सुरुवात केली आणि पाकिस्तानची घोडदौड थांबायला सुरुवात झाली.
गांगुलीने गोलंदाजीत सातत्य राखत ठराविक अंतराने पाकिस्तानच्या विकेट घेण्यास सुरुवात केली. गांगुलीने त्या सामन्यात ५ विकेट घेत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गांगुलीने १० षटकांत केवळ १६ धावा दिल्या होत्या.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००३ सालच्या विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघात आमूलाग्र बदल झाले होते. सध्या सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दहशतवादी हल्ल्यांमुळे क्रिकेटवर परिणाम झाल्याच्या ५ घटना; पाकिस्तान राहिलाय केंद्रबिंदू
टी२० विश्वचषक: पाकिस्तानशी भिडण्याआधी सराव सामन्यात ‘टीम इंडिया’ ‘या’ तगड्या संघांशी करणार दोन हात
जीवाभावाची मैत्री! क्वारंटाईनमधून बाहेर येताच विराटची जवळच्या मित्राशी कडाडून गळाभेट, पाहा व्हिडिओ