महाराष्ट्र राज्यात ७ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही ना. पण खरं आहे हे, अगदी शंभर टक्के. ज्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना होतो, त्याला आपण आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणतो किंवा त्याला आंतरराष्ट्रीय मैदान तरी म्हणतो. अशी तब्बल ७ स्टेडियम किंवा मैदानं महाराष्ट्रात आहेत. देशात महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्यात एवढ्या मोठ्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने झालेत. ते स्टेडियम कोणते हे आपण सविस्तर पाहणार आहोत.
भारतात सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला तो १५ डिसेंबर १९३३ रोजी. मैदान होतं जीमखाना ग्राऊंड, मुंबई. यापुर्वी भारतीय संघ केवळ एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा सामना लॉर्ड्सवर झाला होता. त्यानंतर जीमखाना ग्राऊंडवर भारताचा हा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना तर भारतातील पहिला सामना होता. हा कसोटी सामना टीम इंडिया ९ धावांनी पराभूत झाली. या मैदानावर यानंतर कधीही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. बॉंबे जीमखाना १८७५ साली सुरु झाला होता. हेरिटेज बिल्डिंग असलेल्या मुंबईच्या सुंदर परिसरात हा जीमखाना आहे. ब्रिटीश एकेवेळी त्याचा वापर क्लब म्हणून करत असे.
त्यानंतर थेट १९४८ साली महाराष्ट्रात दुसरा आंतरराष्ट्रीय सामना झाला तो प्रसिद्ध अशा ब्रेबॉर्न स्टेडियमवर. आज महाराष्ट्रात ज्या चार क्रिकेट स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने होतात त्यापैकी सर्वात जुने म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियम. हे भारतातील सर्वात जुन्या क्रिकेट स्टेडियमपैकी म्हणूनही ओळखले जाते. १९३७ मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी हे स्टेडियम बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. भारतीय क्रिकेटची पंढरी असे या स्टेडियमला म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण विजय हजारे, विजय मर्चंट, सुनील गावसकर, सुभाष गुप्ते, पॉली उम्रीगर, विनू मंकड यांसारख्या इंडियन क्रिकेटच्या लिजेंड्सनी याच ग्राउंडवर खेळत आपले करिअर घडवले. २९ ऑक्टोबर २०१८मध्ये येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. यात रोहितने १६२ धावांची खणखणीत खेळी केली होती.
त्यानंतर महाराष्ट्राला आपले तिसरे आंतरराष्ट्रीय स्टेडियम मिळाले ते १९६९ साली नागपुरात. विदर्भ क्रिकेट असोशिएशनचे हे स्टेडियम होते. तब्बल ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर २००७ सालापर्यंत सामने होत होते. भारतीय संघाने येथे तब्बल २१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सुनिल गावसकरांनी वनडे कारकिर्दीत केवळ एक शतकी खेळी केली होती. विदर्भातील हे मैदान लकी होते की, ती खेळी या मैदानावर झाली. हे जगातील असे केवळ एकमेव मैदान आहे, जीथे तुम्ही रस्त्यावरुन थेट चालत जात मैदानावर जाऊ शकत होतात. १९९५ साली भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान भिंत कोसळल्यामुळे येथे ८ प्रेक्षकांना जीव गमवावा लागला होता तर तब्बल ५० प्रेक्षक जखमी झाले होते. २००८ साली विदर्भ क्रिकेट असोशिएशनला जामठा येथे आपले नवेकोर सुसज्ज असे स्टेडियम मिळाल्यावर येथे होणारे सामने मात्र कायमचे बंद झाले.
सध्या भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्टेडियम असलेले वानखेडे स्टेडियम हे देखील लेगसीच्या बाबतीत त्याच श्रेणीतील. ब्रेबॉर्न स्टेडियमची मालकी असलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियासोबत वाद झाल्याने महाराष्ट्र सरकारने १९७४ मध्ये, ब्रेबॉर्न स्टेडियमपासून अवघ्या ७०० मीटरवर भव्यदिव्य असे वानखेडे स्टेडियम बांधले. मुंबई क्रिकेटची पुढची पिढी याच स्टेडियमवर घडली. त्यातील पहिले नाव सचिन तेंडुलकर. वानखेडे स्टेडियमला २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आणि ज्या सचिनने या स्टेडियमवरून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्या सचिनचे विश्वविजेतेपद जिंकण्याचे स्वप्न याच स्टेडियमवर पूर्ण झाले. १९७५ साली बांधलेल्या या स्टेडियमचे पुर्ण नुतनीकरण २०११ विश्वचषकापूर्वी करण्यात आले होते. १९७५ ते २०२१ दरम्यान भारतीय संघ येथे ४९ सामने खेळला आहे. या मैदानाची क्षमता ३३ हजार प्रेक्षकांची आहे.
त्यानंतर महाराष्ट्राला आपले पाचवे आंतरराष्ट्रीय स्टेडियम मिळाले ते देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात. पुण्यातील स्वारगेट परिसरात पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या नेहरु स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला तो भारत विरुद्ध इंग्लंड संघांदरम्यान. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या स्टेडियमवर अगदी २००५ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने होत होते. या मैदानाची क्षमता होती २५ हजार प्रेक्षकांची. या मैदानावर कधीही कसोटी सामने झाले नाहीत. ११ वनडे सामने मात्र या मैदानावर झाले. १९९६ विश्वचषकात केनियाने वेस्ट इंडिजला याच मैदानावर पराभवाची चव चाखायला लावली होती. १९८७ व १९९६ अशा दोन विश्वचषकात या मैदानावर सामने झाले आहेत. दिलीप वेंगसरकर, अजय जडेजासारख्या दिग्गजांनी या मैदानावर शतकी खेळी केल्या आहेत.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही सुसज्ज असे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम २००८ मध्ये बांधले गेले. नागपूरच्या दक्षिणेस जामठा येथे नजरेत भरेल असे हे स्टेडियम आहे. विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियम ज्यांनी बांधले त्याच शशी प्रभू यांनीच या स्टेडियमचादेखील प्लॅन तयार केला. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या असलेल्या स्टेडियमने विश्वचषकाच्या सामन्यांचेही आयोजन केले आहे. भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा माजी कर्णधार सौरव गांगुली याने याच स्टेडियमवर खेळत क्रिकेटला अलविदा केला होता. फिल्ड एरियाचा विचार करता हे भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी हे देशातील सर्वात सुंदर स्टेडियम असल्याचे सांगितले आहे. भारतीय संघाने या स्टेडियमवर १६ सामने खेळले आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात नविन आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून पुण्यातील एमसीएच्या गहुंजे येथील स्टेडियमकडे पाहिले जाते. मुंबई पुणे हायवेवरील गहुंजे गावच्या हद्दीत हे चहुबाजूंनी निसर्गाने संपन्न अशा जागी हे एमसीएचे स्टेडियम आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात नवे आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेले स्टेडियम आहे. ३५ एकर क्षेत्रात पसरलेले हे स्टेडियम २०१२ मध्ये खेळण्यास तयार झाले. या स्टेडियमचे सुरुवातीच्या काळापासून अनेक वादांशी नाते राहिले. तिकीट वाटप, सुब्रतो रॉय वाद, पीच क्युरेटर वाद ही काही चर्चेतील प्रकरणे होती. ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेले हे स्टेडियम मुख्य शहरापासून बाहेर असल्याने येथे क्रिकेटचा आनंद वेगळाच मिळतो. अद्यापही या स्टेडियमच्या कामाचा अंतिम टप्पा पूर्ण व्हायचा आहे. तरीही, आयपीएल आणि इंटरनॅशनल मॅचेस याठिकाणी सातत्याने होत असतात. पुण्याला आयपीएलमध्ये दोन वेळा टीम मिळाल्या. या दोनही टीमचं हे होम ग्राऊंड होतं. तसेच २०२२ आयपीएलच्या साखळी फेरीचे अनेक सामने येथे झाले. २०१८ साली धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे हेच स्टेडियम होम ग्राऊंड होते.
अनेक जणांची नेहमीच गल्लत होते की डॉ. डी वाय पाटील स्टेडियम, नेरुळ या यादीत का नाही. एवढं सुंदर स्टेडियम अनेक आयपीएल सामने येथे झालेले तरीही याला आंतरराष्ट्रीय दर्जा का नाही. तर मंडळी हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचेच आहे परंतू येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या स्टेडियमला २००९ मध्ये इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम होण्याची संधी मिळाली होती, तेव्हा वानखेडे स्टेडियम विश्वचषकासाठी नव्याने बांधले जात होते. तर ब्रेबॉर्नवर सामने होत नव्हते. त्यामुळे डीवाय पाटील स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना होस्ट करायची मोठी संधी चालून आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका टी२० मॅचचे यजमानपद त्यांना मिळालेले. मात्र, जोरदार पाऊस आला आणि ती मॅच रद्द केली गेली. एकाही बॉलचा खेळ झाला नाही. दुर्दैवाने, त्यानंतर त्यांना पुन्हा कधीच इंटरनॅशनल क्रिकेट मॅच होस्ट करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, पहिल्या आणि तिसऱ्या आयपीएलची फायनल याच स्टेडियमवर खेळली गेली. मुंबई इंडियन्सचे हे होम ग्राउंडही बनले. आयपीएल मॅचेसच्या यशस्वी आयोजनानंतर डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमला इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमचा दर्जा मिळू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022 I ट्रॉफी विजयाचं सुख नाही पण ‘हे’ सुख मात्र राजस्थानच्या वाट्याला नक्कीच आलंय
बटलरने ९७३ धावांचा विक्रम मोडला नाही, पण ‘या’ पराक्रमात विराटला मागे टाकलेच