इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. या संघात श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचे दुखापतीतून सावरल्याने पुनरागमन झाले आहे. मॅथ्यूज मंदीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील कसोटी मालिकेला मुकला होता. मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या २२ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
अँजेलो मॅथ्यूजला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, एका स्थानिक टी-२० स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याने त्याला या दौऱ्याला मुकावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात नुवान प्रदीप, रोशन सिल्वा आणि लक्षण संदाकन यासारख्या खेळाडूंना स्थान दिले आहे. याशिवाय नवोदित खेळाडू रमेश मेंडीसला देखील संघात स्थान मिळाले आहे. मात्र त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघात असलेल्या धनंजय डी सिल्वा, कसुन रजिथा, संतुष गुनतिलके आणि दिलशान मधुशनाका या खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका श्रीलंकन भूमीवर खेळवली जात आहे. या मालिकेला १४ जानेवारीपासून सुरुवात होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने गाॅल येथे खेळवण्यात येणार असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीतच ही मालिका खेळली जाईल.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ:
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुशल जनिथ परेरा, दिनेश चंडीमल, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, ओशादा फर्नांडो, निरोशन डिकवेला, मिनोद भानुका, लाहिरु थिरिमाने, लसिथ एम्बुलदेनिया, वनिंदु हसरंगा, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा, विश्वा फर्नांडो, दुश्मंथा चमीरा, दसुन शनाका, असिथा फर्नांडो, रोशन सिल्वा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप आणि रमेश मेंडिस.
महत्वाच्या बातम्या:
विराटपेक्षा रहाणेच्या नेतृत्वात खेळाडू अधिक मोकळेपणाने खेळत आहेत
भारताचा गड, सर करायला अवघड! या तीन महान कर्णधारांना आजवर भारतात जिंकता आली नाही एकही कसोटी
ब्रिस्बेन में आप ही खेलो शुक्ला जी! त्या ट्विटमुळे सोशल मिडीयावर राजीव शुक्ला होत आहेत ट्रोल