जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या संघात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंची कमतरता नाही. मात्र, संघातील सर्वात मोठा मॅचविनर उपकर्णधार आणि वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड आहे. जो आयपीएलमध्ये सामील झाल्यापासून मुंबई संघाकडून सतत खेळतोय आणि खेळाच्या प्रत्येक विभागात योगदान देत आहे. आयपीएल २०२१ मध्ये हेदेखील पाहायला मिळाले. जेव्हा चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २१९ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ अडचणीत आला असताना पोलार्डच्या स्फोटक खेळीमुळे आयपीएलच्या इतिहासात मुंबईला प्रथमच २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्यात यश आले.
टी२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा कायरन पोलार्ड वेगळ्या रंगात दिसतो. फेब्रुवारीमध्ये पोलार्डने श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजय याच्या एका षटकात सहा षटकार लगावले आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. इतकेच नाही तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसतो. मात्र, वेस्ट इंडीजच्या या फलंदाजाची मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची कहाणी तितकीच रंजक आहे. जी ड्वेन ब्राव्हो याने स्वत: कथन केली आहे.
पोलार्ड असा झाला मुंबईकर
टी२० क्रिकेटमधील दिग्गज मानला जाणारा वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याने कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा सदस्य कसा बनला यांचा खुलासा केला. ब्राव्होने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून खेळताना केली होती.
ब्राव्होने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मुंबई इंडियन्सला माझा बदली खेळाडू हवा होता. तेव्हा मी त्यांना पोलार्डविषयी सांगितले. मात्र, त्यावेळी पोलार्ड अन्य एका क्लबशी करारबद्ध होता. त्यानंतर ड्वेन स्मिथ मुंबई इंडियन्सचा भाग बनला. पुढे पोलार्डच माझा उत्तराधिकारी झाला.”
ब्राव्होने पुढे म्हटले, “त्याच वर्षी जेव्हा चॅम्पियन्स लीग सुरू होणार होती आणि तेव्हा पोलार्ड भारतात आलेला. मी मुंबईचे प्रशिक्षक राहुल संघवी व रॉबिन सिंग यांना त्याला भेटण्याविषयी सांगितले. ते तात्काळ मुंबईवरून हैदराबादला आले होते. मी पोलार्डशी त्यांची भेट घडवून आणली. त्यावेळी हे दोघे पोलार्डसाठी २ लक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार घेऊन आले होते. त्रिनीदादसारख्या ठिकाणावरून येणाऱ्या एका १९ वर्षाच्या मुलासाठी हे अविश्वसनीय होते. त्याचा यावर विश्वास बसत नव्हता.”
ब्राव्होने यापुढील कहाणी सांगताना खुलासा केला की, “पोलार्डने त्यावर्षीच्या (२००९) चॅम्पियन्स लीगमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. संपूर्ण जग त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. सर्वांच्या ओठी त्याचे नाव होते. ज्यावेळी जगाला त्याच्याबद्दल माहीत नव्हते तेव्हा मुंबईने त्याला करारबद्ध देखील केले होते. पुढे आयपीएल लिलावात अनेक संघांनी त्याच्यासाठी बोली लावली. येथेदेखील मुंबईने बाजी मारत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. आज आपण पोलार्डविना मुंबई इंडियन्सची कल्पना करू शकत नाही.”
कायरन पोलार्ड आयपीएल मधील सर्वात यशस्वी विदेशी खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक १७१ सामने खेळताना ३१९१ धावा काढल्या आहेत. यामध्ये १६ अर्धशतकानंतर समावेश आहे. मुंबईने जिंकलेल्या सर्व पाच आयपीएल विजेतेपदांमध्ये तसेच दोन चॅम्पियन्स लीग विजेतेपदांमध्ये पोलार्डचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मला भीती वाटली होती’, साहाने सांगितला स्वानुभव