आयपीएलचा १८वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने होते. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात आहेत.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी या निर्णयाचा फायदा घेत पहिल्या डावात ४ बाद १९१ धावा उभारल्या. या डावात चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाने एका खास रेकॉर्डला गवसणी घातली.
रैनाने पूर्ण केले षटकारांचे द्विशतक
चेन्नईच्या डावात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिसने ७४ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर डावखुरा फलंदाज सुरेश रैना मैदानात उतरला. त्याने या डावात १८ चेंडूत २४ धावांची खेळी केली. यात त्याने १ चौकार आणि ३ षटकार ठोकले. यातील तिसर्या षटकारासह त्याने आयपीएल मधील आपले षटकारांचे द्विशतक पूर्ण केले. हा षटकार त्याचा आयपीएल मधील २००वा षटकार ठरला. असे करणारा तो सातवा खेळाडू ठरला. रैना आधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली आणि किरोन पोलार्ड यांनी हा कारनामा केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
१) ख्रिस गेल – ३५४
२) एबी डिव्हिलियर्स – २४०
३) रोहित शर्मा – २२२
४) एमएस धोनी – २१७
५) विराट कोहली – २०४
६) किरोन पोलार्ड – २०२
७) सुरेश रैना – २००*
८) डेव्हिड वॉर्नर – १९९
चेन्नईची विशाल धावसंख्या
दरम्यान, चेन्नईने या सामन्यात पहिल्या डावात १९१ अशी विशाल धावसंख्या उभारली. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या षटकांमध्ये विकेट्स गमावल्याने चेन्नईचा डाव अडखळला होता. मात्र शेवटच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने तुफानी फटकेबाजी करत चेन्नईला मोठे आव्हान उभारण्यात हातभार लावला. त्याने २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे बंगलोरला आयपीएल मधील सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: मॅक्सवेल मुद्दाम सोपा झेल डाईव्ह मारुन अवघड असल्याचे दाखवतो, चहलचा मोठा आरोप!