चेन्नई। इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यासाठी भारतात दाखल झाला आहे. या दौऱ्यात इंग्लंड संघाला ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याला कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये आणि शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. या मालिकेआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तर इंग्लंड संघ श्रीलंकेतून कसोटी मालिका जिंकून चेन्नईत दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आत्मविश्वासाने भरलेले आहेत. अशा परिस्थितीत ही मालिका रंगतदार होईल, अशी अनेकांनी मते मांडली आहेत.
रुटचे असेल आव्हान –
त्यातही सध्या इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार जो रुट भलत्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेत धावांचा रतीब घातला. श्रीलंकेत एकीकडे इंग्लंडचे फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकत असताना जो रुटने दमदार कामगिरी केली. रुट हा फिरकी गोलंदाजी चांगली खेळता येणाऱ्या आशिया खंडाबाहेरील फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर त्याला रोखण्याचे आव्हान कसोटी मालिकेत असणार आहे.
श्रीलंकेत रुटचा धावांचा पाऊस –
श्रीलंकेत इंग्लंडने खेळलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत रुटने ४ डावात १०६.५० च्या सरासरीने तब्बल ४२६ धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या २२८ आणि १८६ धावांच्या खेळीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँजेलो मॅथ्यूजच्या रुटपेक्षा अर्ध्याने कमी धावा आहेत.
याबरोबर रुटने ८००० कसोटी धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याचबरोबर रुटकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे. भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा रुटचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. केवळ ३० व्या वर्षीच रुट १०० वा सामना खेळण्याचा कारनामा करत आहे.
भारताविरुद्ध नेहमीच उजवी कामगिरी –
रुटसाठी भारत हा नेहमीच खास देश राहिला आहे. त्याचे कसोटी पदार्पणही भारतातच झाले आहे. त्याने नागपूर येथे सन २०१२ ला १३ ते १७ डिसेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याचे पदार्पणही धडाक्यात झाले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात नाबाद २० धावा केल्या होत्या. हा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना होता
विशेष म्हणजे २०१२ ची कसोटी मालिका इंग्लंडसाठी प्रचंड खास ठरली होती. या मालिकेत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. २००४ सालापासून भारताचा भारतात कसोटी मालिकेत पराभव करणारा इंग्लंड हा एकमेव संघ आहे.
रुटने भारताविरुद्ध आत्तापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ९ अर्धशतकांसह ५६.८४ च्या सरासरीने १४२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या १६ सामन्यांपैकी ६ सामने त्याने भारतात खेळले आहेत. त्यात त्याने ५३.०९ च्या सरासरीने ५८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
गोलंदाजीतही चमक –
रुट केवळ फलंदाजीतच नाही तर कधीतरी पार्टटाईम फिरकी गोलंदाजीही करतो. त्याने आत्तापर्यंत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. यात एकदा त्याने डावात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा थरार होणार सुरू, ‘हे’ संघ येणार आमने-सामने
शिखर धवन चढणार कोर्टाची पायरी, ‘या’ प्रकरणात झाला गुन्हा दाखल
पुजाराने केला खुलासा, ‘त्या’ सामन्यात केवळ चार बोटात बॅट पकडत केली होती फलंदाजी