भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक घडीला आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने भारताला नमवले; तर दुसऱ्या कसोटी सामन्यात याउलट स्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.
जरी मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला; तरी संघातील काही खेळाडूंचे प्रदर्शन सुमार राहिले आहे. जर त्या खेळाडूंनी त्याच्या प्रदर्शनात सुधारणा केल्या नाहीत, तर संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठे नुकसान होऊ शकते. या लेखात आम्ही खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
या तीन भारतीय क्रिकेटपटूंना कराव्या लागतील सुधारणा –
१. चेतेश्वर पुजारा
भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आतापर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खास कामगिरी करू शकला नाही. त्याने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र यावेळी हा ३२ वर्षीय फलंदाज साधे अर्धशतकही करू शकला नाही. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात ४३ धावा आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात २० धावा केल्या आहेत. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यात पुजाराची फलंदाजी अशाच प्रकारे सुमार राहिली; तर भारतीय संघाला मोठे नुकसान झेलावे लागू शकतो.
२. मयंक अगरवाल
कोणत्याही क्रिकेट सामन्यात संघातील सलामीवीर फलंदाजांनी मोठी आकडी खेळी केली, तर मधळ्या फळीतील फलंदाजांवर जास्त दबाव येत नाही. पण भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल दोन्ही सामन्यात २० धावांचा आकडाही गाठू शकला नाही. त्यामुळे या सलामीवीर फलंदाजाला त्याच्या फॉर्ममध्ये सुधारणा कराव्या लागणार आहे. जेणेकरुन तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाच्या आशा वाढतील.
३. हनुमा विहारी
कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमा विहारीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतीत वरच्या फळीपासून ते खालच्या फळीपर्यंत फलंदाजी केली आहे. त्यामुळे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करताना मोठ्या आकडी धावा करण्याचा अनुभव त्याला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली छाप पाडण्यात विहारीला यश आले नाही. आतापर्यंत झालेल्या दोन कसोटी सामन्यात मिळून विहारीने केवळ ४५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी संघाला दमदार पुनरागमनाची गरज होती. त्यावेळीच विहारीने खराब प्रदर्शन करत सर्वांना निराश केले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात विहारीला लयीत यावे लागणार आहे आणि संघासाठी मॅच विनिंग खेळी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
100% फिट नसुनही ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळणार तिसरा सामना, कोचने सांगितले कारण
रहाणेच्या नेतृत्त्वाची माजी महिला क्रिकेटरला पडली भुरळ; म्हणाली, “हे काम फक्त तोच करू शकतो”
धक्कादायक! इंग्लंडच्या ‘या’ दोन माजी अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर केला वर्णभेदाचा आरोप