भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (10 जानेवारी) खेळला जाणार आहे. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याची वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी आहे. या सामन्यात विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी आणि मालिकेत धावांचा पाऊस पाडला तर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने यांना मागे टाकण्याची संधी आहे.
विश्वविक्रम आहे भारतात सर्वाधिक शतके करण्याचा. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 2011पासून या विक्रमाच्या यादीत पहिल्या स्थानावार आहे. विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक जरी शतक ठोकले, तर तो सचिनची बरोबरी करेल. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. आता ते वनडे मालिकेत परतत असून त्यामध्ये रोहित-विराट बरोबर केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
घरच्या मैदानावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्यामध्ये सचिन 20 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याने घरच्या मैदानावर शेवटचे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2011मध्ये केले होते. विराटचे भारतात आतापर्यंत 19 आंतरराष्ट्रीय शतके झाली आहेत. त्याने 101 सामन्यात ही कामगिरी केली, तर सचिनला 20 शतके करण्यासाठी 164 सामने लागले.
घरच्या मैदानावर सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमला 14 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींग (13) चौथ्या स्थानावर आहे.
या मालिकेत विराटला आणखी एक विक्रम रचण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत पहिल्या पाचमध्ये विराटला पोहोचण्याची संधी आहे. त्याने 265 सामन्यात 57.47च्या सरासरीने 12471 धावा केल्या आहेत. तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने 12650 धावांसह आहे. या यादीत सचिन पहिल्या क्रमांकावर असून त्याने 463 सामन्यात 44.83च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत.
घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-
सचिन तेंडुलकर – 20
विराट कोहली – 19*
हाशिम आमला – 14
रिकी पॉंटींग – 13
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: गुवाहाटीत रोहित-विराटच्या नावावर वनडे शतके; जाणून घ्या पिच रिपोर्ट, टॉसची भूमिका काय असेल
फ्रान्सचा गोलकीपर-कॅप्टन ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, रिप्लेसमेंटचे नावही सांगितले