इंग्लंड विरुद्ध भारत 5 कसोटी सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेपूर्वी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील या मालिकेसाठी तयार आहे. त्याने मालिकेपूर्वी मोठी प्रतिक्रिया देत रणशिंग फुंकले आहे.
कसोटी मालिकेच्या आधीच मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या संघाला चेतावणी दिली आहे. ‘ज्याप्रकारे आम्ही ऑस्ट्रेलियाला पराभूत केले त्याचप्रकारे इंग्लंडलाही हरवू’
मोहम्मद सिराज इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याने भारताच्या २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही शानदार कामगिरी करत भारताच्या कसोटी मालिका विजयात मोलाचे योगदान दिले होते.
सिराज टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाल, ‘ ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेने मला खूप काही शिकवले आहे. अज्जू भैया(अजिंक्य रहाणे) च्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव अप्रतिम होता. अजिंक्य राहणेने मला खूप पाठिंबा दिला. तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो. जिंकल्यानंतर ट्रॉफी पकडणे आणि संघासोबत आनंद व्यक्त करणे हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे.’
मोहम्मद सिराज म्हणाला ‘मला पूर्ण विश्वास आहे आम्ही इंग्लंडलाही त्याचप्रकारे हरवू, ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. मी चिंताग्रस्त नाही, मला खात्री आहे. आमच्या संघात खूप स्टार (दिग्गज)खेळाडू आहेत. मला विश्वास आहे की विराट भैयाच्या नेतृत्वाखाली भारत इंग्लंडला मात देईल. आमचा संघ खूप मजबूत दिसतोय आणि आम्ही या मोठ्या मालिकेसाठी तयार आहोत.’
सिराज पुढे इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटबद्दल म्हणाला, ‘जो रूट इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. मी त्याच्या विकेटला माझे लक्ष्य बनवले आहे. आणि अन्यही फलंदाज आहेत, ज्यांना मी लक्ष्य करणार आहे. मी मायदेशातील मालिकेत रूटला बाद केले होते आणि तो माझ्या योजनाचा भाग होता. माझे लक्ष संघासाठी जास्तीत जास्त विकेट्स घेण्याचे आहे.’
इंग्लंडने याचवर्षी भारतात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत इंग्लंडला ३-१ अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्याचा इंग्लंड आगामी मालिकेतून प्रयत्न करेल. तसेच भारतीय संघ १४ वर्षांपासून प्रतिक्षा असलेला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका विजय मिळवण्यास उत्सुक असेल. भारताने इंग्लंडमध्ये अखेरचा कसोटी मालिका विजय २००७ साली मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळातच नाही तर कमाईतही एक नंबर आहे पीव्ही सिंधू
संघाला पहिला वनडे विजय ज्यादिवशी मिळवून दिला, त्याच्या बरोबर ३ वर्षांनी कर्णधाराने घेतली निवृत्ती