चेन्नईमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात काही परदेशी खेळाडूंना कोट्यावधींची बोली लागली. यात झाय रिचर्डसन या युवा ऑस्ट्रेलियन खेळाडूचाही समावेश आहे. भारतीय संघाविरूद्ध खेळताना विराट कोहलीला बाद करणाऱ्या युवा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर पंजाब किंग्स संघाने १४ करोड रुपयांची बोली लावली.
या ऑस्ट्रेलियन खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांमध्ये स्पर्धा सुरू होती. यात पंजाब किंग्स संघाने बाजी मारली आणि २४ वर्षीय गोलंदाजाला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
पर्थ स्कॉर्चर्स संघाच्या विजयात मोलाची भूमिका
बिग बॅश लीगमध्ये यंदाच्या १० व्या हंगामात पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून खेळताना २९ गडी बाद करणारा झाय रिचर्डसन हा २०२१ च्या आयपीएल लिलावातील तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे. १.५ करोड मूळ किंमत असलेल्या या गोलंदाजाला पंजाब किंग्स संघाने १४ करोड रुपयात खरेदी केले आहे.
रिचर्डसनने २०१६ मध्ये अवघ्या १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याची पर्थ स्कॉर्चर्स संघात निवड करण्यात आली होती. त्याच वर्षी पर्थ स्कॉर्चर्स संघ विजयी देखील झाला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.
विराट कोहलीला केले होते बाद
२०१८ साली ब्रेडमॅन यंग क्रिकेटर ऑफ दी ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या झाय रिचर्डसन याने २०१९ साली झालेल्या भारतीय संघाविरुद्धच्या वनडे सामन्यात विराट कोहलीची विकेट आपल्या नावावर केली होती. त्यानंतर त्याने १३ वनडे सामने खेळले आहेत आणि २४ गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. तसेच कसोटी सामन्यात त्याने ८ गडी बाद केले आहेत.
तसेच तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ६२ सामने खेळला असून यात त्याने ७८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वानखेडेवर पुन्हा तेंडुलकर! अर्जुनला मुंबई इंडियन्सने खरेदी केल्यानंतर मीम्सचा सुळसुळाट
सनरायझर्ससाठी बोली लावणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण ? चर्चेला उधाण